पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता या योजनेचा २० वा हप्ता जूनमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांत ६ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करते.
पीएम किसान सन्मान निधी (PM-KISAN) ही केंद्र सरकारची भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे.
२० वा हप्ता मिळविण्यासाठी पंतप्रधान किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
२४ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएम मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी केला होता. या हप्त्याद्वारे देशातील सुमारे ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे २२ हजार कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली होती. या लाभार्थ्यांमध्ये २.४१ कोटी महिला शेतकरी होत्या, हे उल्लेखनीय आहे.
आता शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा २०२५ मधील दुसरा हप्ता असेल. २० वा हप्ता कधी जमा होणार? याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. या योजनेच्या नियमित वितरण वेळापत्रकानुसार, फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर या महिन्यात हप्ता जारी केला जातो. यानुसार आता पुढील हप्ता जून २०२५ मध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे.
पीएम किसान अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक, बँक आयएफएससी कोड आणि बँक खाते आणि सेल फोन नंबर असणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांचे बँक आणि आधार माहिती अपडेट करावी, असे सांगितले जाते. चुकीची माहिती असल्यास पेमेंटमध्ये विलंब अथवा नकार येऊ शकतो.
pmkisan.gov.in वर भेट द्या.
Know Your Status हा पर्याय निवडा.
तुमचा नोंदणी क्रमांक टाइप करा (किंवा तो मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा आधारचा वापर करा).
कॅप्चा पूर्ण करा आणि त्याची पुष्टी करण्यासाठी OTP वापरा.
तुम्हाला PM-KISAN स्टेटस दिसेल.