

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांचे राजीनामे बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले. अध्यक्ष पाटील यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने उपाध्यक्ष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत रुकडी (ता. हातकणंगले) येथील खत कारखाना सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, तब्येत बरी नसल्यामुळे बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचे अध्यक्षांनी कळविले असल्याचे उपाध्यक्ष शेळके यांनी सांगितले.
शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष शेळके यांनी नेत्यांच्या आदेशावरून आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. हे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी सहकार उपनिबंधकांकडे पाठविले जातात. त्यासाठी बुधवारी सचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या विषयपत्रिकेवर अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या राजीनाम्यासह 37 विषय होते. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपाध्यक्ष शेळके म्हणाले, गेल्या वर्षभरात व्यवसाय वाढविण्याचा व कर्ज कमी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यवसायामध्ये वीस टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. आम्ही उद्दिष्टापर्यंत पोहचू शकलो नाही; परंतु 10 ते 12 टक्क्यांनी व्यवसाय वाढविण्यात यश आले.
अमरसिंह माने म्हणाले, शेतकरी संघाला खास बाब म्हणून संघाचे बैल छाप आणि महामंडळाचे खताचे उत्पादन घेण्यास परवानगी मिळावी म्हणून नेत्यांसमवेत कृषी मंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे. यावेळी सर्जेराव देसाई, आनंदा बनकर, सुनील मोदी, दत्ताजीराव वारके, आप्पासो चौगुले, सुभाष जामदार, प्रधान पाटील, परशुराम कांबळे, अॅड. दत्तात्रय राणे आदी उपस्थित होते.
महिनाअखेरपर्यंत नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळणार असल्यामुळे अध्यक्षपदासाठी यावेळी बाबासाहेब शिंदे, प्रधान पाटील, सुभाष जामदार, अमरसिंह माने यांची नावे चर्चेत आहेत. असे असले, तरी यासंदर्भात नेत्यांची बैठक अद्याप न झाल्याने त्यांच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.