WhatsApp Username Feature File Photo
राष्ट्रीय

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपमध्ये नवीन ‘युझरनेम’ फीचर; मोबाईल नंबर नसला तरी करता येणार चॅट

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सॲपमध्ये युझरनेम फीचर उपलब्ध होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

मोहन कारंडे

WhatsApp Username Feature

नवी दिल्ली: मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सॲपमध्ये युझरनेम फीचर उपलब्ध होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याचा अर्थ नवीन फीचरमुळे तुम्हाला नवीन व्यक्तीशी संपर्क करायचा असेल तर फोन नंबरची गरज नाही. फक्त युझरनेम असेल तर तुम्हाला चॅट करता येईल. त्यामुळे वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल.

मार्क झुकरबर्ग यांनी काय सांगितले?

झुकरबर्ग यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये व्हॉट्सॲपममधील एक नवीन "युझरनेम तयार करा" पेज दिसत आहे. त्या पेजवर असे नमूद केले आहे की, "या युझरनेमद्वारे लोक तुमच्याशी संपर्क साधू शकतील," यावरून भविष्यात वापरकर्त्यांना मोबाईल नंबरऐवजी युझरनेमद्वारे शोधता आणि संपर्क साधता येणार आहे. पेजवरील आणखी एका संदेशात असे लिहिले आहे की, "या वर्षाच्या अखेरीस व्हॉट्सॲपमवर युझरनेम येत आहेत. तुमचे युझरनेम आताच राखून ठेवा. तुमचा नंबर न देता संपर्क साधण्याचा हा एक अधिक खासगी मार्ग असेल."

व्हॉट्सॲपमध्ये युझरनेम फीचर कसे काम करेल?

हे फीचर सुरू झाल्यानंतर प्रत्येक वापरकर्ता स्वतःचा युझरनेम तयार करेल. त्यानंतर इतरांना चॅट करण्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता भासणार नाही. फक्त युझरनेम शेअर करून संपर्क साधता येईल. हे फीचर टेलिग्राम मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या युझरनेम प्रणालीप्रमाणेच काम करेल, जिथे वापरकर्ते फोन नंबरची देवाणघेवाण न करता संपर्क साधू शकतात.

फीचर महत्त्वाचे का आहे?

ॲप लाँच झाल्यापासून व्हॉट्सॲपम फोन नंबरवर अवलंबून आहे. युझरनेममुळे गोपनीयता आणखी वाढेल. विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी जे त्यांच्या वैयक्तिक संपर्क यादीबाहेरील लोकांशी संवाद साधतात. हे फीचर क्रिएटर्स, फ्रीलान्सर्स, व्यवसाय, ऑनलाइन विक्रेते आणि कम्युनिटी ॲडमिनिस्ट्रेटर्स यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते, जे ग्राहक किंवा नवीन संपर्कांशी वारंवार संवाद साधतात. यामुळे वैयक्तिक फोन नंबर उघड न करता इतरांशी संपर्क साधणे देखील सोपे होते.

फीचर कधी उपलब्ध होणार?

मेटाने सध्या एवढेच स्पष्ट केले आहे की, युझरनेम फीचर यावर्षाअखेरीस व्हॉट्सॲपमध्ये उपलब्ध होईल. मात्र, ते टप्प्याटप्प्याने सुरू होईल का, कोणत्या वापरकर्त्यांना प्रथम मिळेल किंवा युजरनेम तयार करण्यासाठी कोणते नियम असतील, याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT