Zombie Drug Explainer: नुकतेच बंगळुरूमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एक तरूण एका जागी स्तब्ध झाला होता. ना तो पुढं सरकत होता ना मागं... तो एका वेगळ्याच धुंदीत असल्याचं जाणवत होतं. अशा प्रकारचा हा पहिलाच व्हिडिओ भारतात व्हायरल झालेला नाही. यापूर्वी चंदीगडमधील एक तरूण डिलिव्हरी बॉय देखील तोंडात बीडी ठेवून असाच स्तब्ध उभा असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हे व्हिडिओ व्हायरल होतानाच व्हिडिओच्या कॅप्शनमधील एका शब्दाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तो शब्द म्हणजे झोम्बी ड्रग्ज.... अनेक नेटकऱ्यांनी हे तरूण zombie drug च्या प्रभावाखाली आहेत त्यामुळं ते असं वागत आहेत असा दावा केला. हे ड्रग्ज घेतल्यानंतर व्यक्ती अनेक तास एकाच जागी स्तब्ध होतो. इतके घातक झोम्बी ड्रग्स नेमकं आहे तरी काय? ते भारतात कसं आलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न....
झायलजीन (Xylazine) हे प्राण्यांना देण्यात येणारं भूलीचं औषध आहे. या उपचारात प्राण्यांना शांत किंवा काही प्रमाणात बेशुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. हे औषध वेदनेतील संवेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येतं. या झायलजीन भूलीच्या औषधाला ट्रँक असं देखील म्हटलं जातं. हे औषध non-opioid ड्रग आहे. म्हणजेच ते अफीमपासून तयार केलेलं नाही.
मात्र हे औषध ज्यावेळी opioid drugs सोबत म्हणजेच फेनटायल, हेरॉईन किंवा कोकेनसारख्या ड्रग्ससोबत दिलं जातं. त्यावेळी उच्च दर्जाची आणि वेगवान नशा होते. अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनला सहसा झोम्बी ड्रग्स म्हटलं जातं.
झोम्बी हे नाव या ड्रग्जच्या प्रभावामुळं पडलं आहे. जे कोणी या ड्रग्जच्या अंमलाखाली येतं तो व्यक्ती पुतळ्यासारखा एका जागी स्तब्ध होतो. तो काही प्रमाणात बेशुद्ध अवस्थेत पोहचता. काही गंभीर केसेसमध्ये पीडिताच्या शरीरावर जखमा आणि लाल चट्टे निर्माण होतात.
अनेक सायन्स फिक्शन चित्रपटात काही व्यक्ती या जिवंत मृतदेहात रूपांतरित होतात असं दाखवलं जातं. याचप्रमाणे हे ड्रग्स घेतल्यावर व्यक्ती मोशनलेस आणि प्रतिक्रिया न देणारा बनतो. त्यामुळं त्याला झोम्बी ड्रग्ज म्हटलं जातं.
झायलजीन सर्वात आधी १९६२ मध्ये जर्मन कंपनीने तयार केलं होतं. हे औषध जनावरांना शांत करण्यासाठी आणि त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येतं. ही जुनी पद्धत आहे. याचा वापर मानवावर करण्यास मनाई आहे.
झोम्बी ड्रग हे हेरॉईन आणि फेनटायल सोबत मिक्स करण्याची दोन कारणं सांगितली जातात. पहिलं कारण म्हणजे हे स्वस्त आहे. हे ड्रग्ज ब्लॅक मार्केटमध्ये ५०० ते १००० रूपये प्रती किलो मिळतं.
युएस ड्रग्ज एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन DEA यांनी सांगितलं की झायलजीन हेरॉईन आणि त्यासारख्या ड्रग्ससोबत मिक्स करून घेण्याचं कारण म्हणजे ड्रग्जचा प्रभाव दीर्घकाळ टिकवणं. फेनटायल हे १९५९ मध्ये पेन किलर म्हणून डेव्हलप करण्यात आलं होतं. आता ते हेरॉईनपेक्षा जास्त प्रभावी मानलं जातं. याचा प्रभाव तीव्र मात्र कमी काळासाठी असतो. त्यात झायलजीन मिसळल्यानंतर त्याचा प्रभाव दीर्घकाळासाठी वाढवता येतो.
हो, हे खरे आहे. झायलाझिन (Xylazine) हे मेंदू आणि मज्जासंस्थेतील 'अल्फा-२ रिसेप्टर्स' सक्रिय करते. यामुळे मेंदूतील 'नॉरपेनेफ्रिन' (Norepinephrine) या न्यूरोट्रांसमीटरची निर्मिती कमी होते. हे तेच घटक आहेत जे शरीराला सतर्क आणि जागे ठेवण्यास मदत करतात. याचा शरीरावर दोन प्रकारे परिणाम होतो:
१) मेंदूची कार्यक्षमता कमी होणे: मेंदू पूर्णपणे शांत (Sedated) अवस्थेत जातो. व्यक्तीला प्रचंड गुंगी येते आणि तिला सभोवतालच्या परिस्थितीचे भान राहत नाही.
२) स्नायू शिथिल होणे: शरीरातील शक्ती आणि हालचाल करण्याची क्षमता कमी होते. मेंदूकडून स्नायूंना योग्य संकेत मिळत नसल्यामुळे, एखादी व्यक्ती तासनतास एकाच स्थितीत पुतळ्यासारखी उभी किंवा बसून राहू शकते.
जेव्हा हे औषध 'फेंटानिल' किंवा इतर अंमली पदार्थांसोबत मिसळले जाते, तेव्हा त्याचे परिणाम अधिक घातक होतात.
भारतात झायलाझिनच्या अवैध वापराबाबत अद्याप कोणतीही ठोस अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. CDSCO च्या नियमांनुसार, याचा वापर केवळ प्राण्यांच्या उपचारांसाठी (Veterinary Use) करण्यास परवानगी आहे.
भारतातील अमली पदार्थांची स्थिती: २०१९ च्या सर्वेक्षणानुसार, भारतात सुमारे ५.७ कोटी लोक ओपिओइड्स आणि हेरॉईनसारख्या अंमली पदार्थांचे सेवन करतात, तर ४ कोटी लोक इतर प्रकारची नशा करतात.
नवे संकट - मेडेटोमिडाइन: २०२४ च्या DEA अहवालानुसार, आता झायलाझिनची जागा 'मेडेटोमिडाइन' (Medetomidine) या नवीन औषधाने घेतली असून ते ३०० पटीने अधिक शक्तिशाली आहे. चीन या पदार्थांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे, त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
प्रभावित राज्ये: भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी आणि व्यसनाधीनता सर्वाधिक आहे.