पुढारी ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसरा कार्यकाळाला आज १७ सप्टेंबर रोजी १०० दिवस (100 days of Modi 3.0) पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोदी सरकारच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, "देशातील विकास, सुरक्षा आणि गरिबांच्या कल्याणासाठी १० वर्षे समर्पित केल्यानंतर जनतेने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना जनादेश दिला. गेल्या ६० वर्षात हे पहिल्यांदाच घडले. त्यामुळे देशात राजकीय स्थैर्य निर्माण झाले. आम्ही धोरणांची अंमलबजावणी केली. गेल्या १० वर्षात देशातील अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मजबूत करून मजबूत भारताच्या उभारणीत मोदी सरकार यशस्वी ठरले.''
स्वातंत्र्यानंतर जगाने पहिल्यांदाच भारताचे ताठ बाण्याचे परराष्ट्र धोरण पाहिले. पूर्वीच्या सरकारमध्ये ताठ कणा नव्हता. पण आज देशाच्या परराष्ट्र धोरणात एक ताठ बाणा दिसत आहे, असे शहा म्हणाले. १०० दिवसांत सुमारे १५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.
पीएम मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण आणले. ज्यात आपली प्राचीन शिक्षण प्रणाली आणि आधुनिक शिक्षण आहे. त्यात आपल्या प्रादेशिक भाषांचाही सन्मान करण्यात आला आहे. असे शहा यांनी म्हटले आहे.
''भारत हे जगातील उत्पादनाचे केंद्र बनले आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो. जगातील अनेक देशांना आमची डिजिटल इंडिया मोहीम समजून घेऊन ती त्यांना त्यांच्या विकासाचा आधार बनवायची आहे. आम्ही शिस्त आणली आणि अर्थव्यवस्थेच्या सर्व १३ पॅरामीटर्समध्ये प्रगती साधली. अंतराळ क्षेत्रात भारताचे भविष्य उज्ज्वल आहे हे आता जगाने मान्य मान्य केले आहे. ६० कोटी भारतीयांना घरे, शौचालये, गॅस, पिण्याचे पाणी, वीज, ५ किलो मोफत रेशन आणि ५ लाखांपर्यंत आरोग्य सेवा मिळाली आहे. आमचे उद्दिष्ट हे आहे की पुढच्या वेळी जेव्हा आपण निवडणुकीत उतरू तेव्हा कोणाला घर नाही असा कोणीही नसेल..." असा दावा शहा यांनी केला.
पीएम मोदी यांचा आज ७४ वा वाढदिवस असून ते ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले, "देशातील अनेक संस्थांनी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस 'सेवा पंधरवडा' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते लोकांना मदत करतील. पीएम मोदी त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान झाले. १५ विविध राष्ट्रांनी त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. १४० कोटी भारतीय आज त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत."