West Bengal rains:
दार्जिलिंग: उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने मात्र अद्याप मृतांची अधिकृत संख्या जारी केलेली नाही.
दार्जिलिंग, कालिम्पोंग आणि सिक्कीम जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कालिम्पोंगमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. दार्जिलिंग जिल्ह्याला भूस्खलन आणि पूल कोसळण्याच्या घटनांनी मोठा फटका बसला आहे.
पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान मोदींनी दार्जिलिंगमधील पूल कोसळल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "दार्जिलिंगमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेतील जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे अत्यंत दुःखी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसराच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आम्ही बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत," असे मोदींनी 'एक्स' वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
लोखंडी पूल कोसळला, वाहतूक ठप्प
पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे दुधिया येथील लोखंडी पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर सिलीगुडी-दार्जिलिंग एसएच-१२ रस्त्यावर वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
मिरिक-सुखियापोखरी रस्त्याजवळ भूस्खलन
सर्वात मोठे भूस्खलन मिरिक-सुखियापोखरी रस्त्याजवळ झाले, ज्यामुळे अनेक घरे वाहून गेली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या अनेक लहान गावांचा संपर्क तुटला. आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर इतर काही लोक अडकले असल्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळे येत आहेत. स्थानिक लोक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उप-हिमालयातील पश्चिम बंगाल, ज्यात दार्जिलिंग आणि कालिम्पोंगचा समावेश आहे, साठी ६ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे. तीव्र उतारांमुळे भूस्खलने होऊ शकते, असा विभागाने इशारा दिला आहे.