West Bengal Election Violence pudhari
राष्ट्रीय

West Bengal Election Violence: निकालानंतर पश्चिम बंगाल पेटला... ३ जणांचा मृत्यू; TMC ची कार्यालये, लेनिनचा पुतळा फोडला

Anirudha Sankpal

West Bengal Election Violence: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. आता भाजपचं सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे राज्यात जाळपोळ, हिंसाचार आणि फोडाफोडी सुरू झाली आहे. बंगालच्या वेगवेगळ्या ठिकाणासून हिंसा आणि तोडफोड केल्याचे वृत्त येत आहे. तृणमूल काँग्रेसची अनेक कार्यालये तोडली असून काही ठिकाणी बुल्डोजर कारवाई देखील झाली आहे. विशेष म्हणजे लेनिनची मूर्ती देखील तोडण्यात आली. राज्यात झालेल्या आतापर्यंतच्या हिंसाचारात जवळपास ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आसनसोल उत्तर विधानसभा क्षेत्रातील कोर्ट मोडवरील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय रात्री उशिरा पेटवण्यात आलं. यामुळं या भागात तणावाचं वातावरण तयार झालं. हे कार्यालय तृणमूल काँग्रेसचे वॉर्ड क्रमांक ५३ च्या नेत्या मौसमी बोस यांचे होते. ही आग वेगानं पसरली अन् संपूर्ण कार्यालय जळून खाख झालं. आग एवढी भयंकर होती की शेजारील एका दुकानाचे देखील नुकसान झाले. नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं.

लेनिन यांचा पुतळा फोडला

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जियागंजमधील एक घटना समोर येत आहे. इथं लेनिन यांचा अनेक दशकांपूर्वीचा पुतळा तोडण्यात आला आहे. महुआ मोईत्रा यांनी भाजप कार्यकर्त्यांनी लेनिन यांचा पुतळा फोडल्याचा आरोप केला. या ठिकाणी दुसरा पुतळा बसवण्याचं प्लॅनिंग देखील असल्याचा दावा मोईत्रा यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपने स्पष्टीकरण देत या घटनेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा कोणताही हात नाहीये. भाजपने दावा केला आहे की निवडणुकीनंतर जल्लोष करत असताना वेगवेगळ्या समुहातील लोक उपस्थित होते. कोणी एका अज्ञात व्यक्तीने लेनिन यांचा पुतळा फोडण्याचे काम केले असावे.

दरम्यान, या सगळ्यात काँग्रेस देखील मागे हटली नाही. काँग्रेसने नदिया मधील टीएमसीचे कार्यालय आपल्या ताब्यात घेतलं. ही घटना नदियामधील करीमपूर २ ब्लॉकच्या नतिडांगा ग्राम पंचायतमध्ये घडली. काँग्रेसचे म्हणणे आहे की यापूर्वी हे कार्यालय आमच्या पक्षाचे होते. त्यावर टीएमसीने कब्जा केला होता.

३ लोकांचा गेला जीव

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर आतापर्यंत ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना ही कोलकाता येथील बेलेघाटा इथं झाली होती. तिथं तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते विश्वजीत पटनायक यांची ४ मे रोजी हत्या करण्यात आली. टीएमसीने ही हत्या भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे असा आरोप केला .

मंगळवारी बीरभूम येथे नानूरमध्ये एक टीएमसी कार्यकर्ता आणि उत्तर २४ परगनाचे न्यू टाऊनमधील भाजप कार्यकर्त्याची देखील हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

नानूरमधील तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या ही गटबाजीतून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. न्यू टाऊनमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आला. त्याचा यामध्ये मृत्यू झाला. या तीनही खून प्रकरणात तृणमूल आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांवर आरोप करत आहेत.

भर दिवसा हत्या

यापूर्वी दोन लोकांची हत्या झाल्याचा प्रकार देखील समोर आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिवसा बीरभूमच्या नानूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कथितरित्या टीएमसी कार्यकर्ता अबीर शेखची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

तर सायंकाळी न्यू टाऊन भागात विजयी यात्रेवेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या मधू मंडल या भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

टीएमसी कार्यालयावर बुल्डोझर

मंगळवारी रात्री कोलकातामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं. काही लोक बुल्डोजर घेऊन आले आणि त्यांनी ऐतिहासिक हॉग मार्केटजवळील तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यालयावर हल्ला केला. यामुळं स्थानिक दुकानदारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं अन् त्यांनी पटापट दुकाने बंद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT