West Bengal election Pudhari
राष्ट्रीय

West Bengal election: भाजपने ममतांची 15 वर्षांची सत्ता उलथवली

नंदीग्रामची पुनरावृत्तीः बंगालच्या वाघिणीचा भवानीपुरात 15,105 मतांनी पराभव

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात सोमवारी ऐतिहासिक वळण पाहायला मिळाले. गेल्या 15 वर्षांपासून राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) मोठा धक्का बसला असून, भारतीय जनता पक्षाने बहुमताचा 148 हा आकडा पार करत मुसंडी मारली आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 294 सदस्यांच्या विधानसभेत भाजप 185 जागांवर आघाडीवर आहे, तर तृणमूल काँग्रेस अवघ्या 91 जागांवर मर्यादित राहिली आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीनंतर ईव्हीएमची मोजणी सुरू झाली. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपची घोडदौड कायम असून सीमावर्ती भाग, आदिवासी पट्टा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसला कोलकाता आणि काही ग्रामीण बालेकिल्ल्यांमध्येच आपले अस्तित्व टिकवता आले आहे. विशेष म्हणजे, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा मतदारसंघातील निवडणूक लोकशाही प्रक्रियेतील त्रुटींमुळे रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भवानीपूर मतदारसंघात बंगालची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे.

भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी 15 हजार 105 मतांच्या फरकाने त्यांना धूळ चारली. नंदीग्राममधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भवानीपुरात परतलेल्या ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागल्याने बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

भवानीपूरमधील मतमोजणीचा प्रत्येक फेरीगणिक बदलणारा कल श्वास रोखून धरणारा ठरला. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुवेंदु अधिकारी यांनी आघाडी घेतली होती, मात्र मधल्या टप्प्यांमध्ये ममता बॅनर्जी यांनी कमबॅक करत 19,000 मतांपर्यंतची भक्कम आघाडी मिळवली होती. 13 व्या फेरीपर्यंत ममता 7,184 मतांनी पुढे होत्या.

मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये सुवेंदु अधिकारी यांनी अनपेक्षित मुसंडी मारली. टपाली मतपत्रिका आणि शेवटच्या टप्प्यातील ईव्हीएम मशिनच्या मोजणीत अधिकारी यांनी ममतांची आघाडी मोडीत काढत अखेर 15,105 मतांनी विजय खेचून आणला.

मला अधिकाऱ्यांनी लाथ मारली : ममता बॅनर्जी

पराभव दिसू लागताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले. दुपारी 3 वाजता मी केंद्रावर गेले असता तिथे आम्हाला मारहाण करण्यात आली. मला स्वतःलाही लाथ मारली गेली, असा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला.

तिथे सीसीटीव्ही कॅमेरे मुद्दाम बंद करण्यात आले होते आणि आमच्या एकाही पोलिंग एजंटला आत प्रवेश दिला गेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही एजंटस्‌‍ना रोखण्यात आले असून भाजपने 100 जागांची लूट करून हा अनैतिक विजय मिळवला असल्याचा दावा त्यांनी केला. मतमोजणी केंद्रातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

हा जनतेचा कौल : सुवेंदु अधिकारी

नंदिग्राम आणि भवानीपुरात विधानसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींच्या आरोपांचा समाचार घेत हा जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे. ममता बॅनर्जींचे आरोप म्हणजे निव्वळ नाट्य. तसेच भाजप आता राज्यात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोंटेश्वर मतदारसंघात भाजपचा पहिला विजय

भाजपने सुरूवातीलाच 6 जागा जिंकल्या. यामध्ये मेदिनीपूर, कालिम्पोंग, दार्जिलिंग, मोंटेश्वर, भातार आणि आसनसोल दक्षिण या जागांचा समावेश आहे. यातील मोंटेश्वर मतदारसंघ जिंकून भाजपने वंगभूमीतील आपल्या यावेळच्या पहिल्या विजयाची नोंद केली.

हुमायू कबीर दोन ठिकाणी आघाडीवर

गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या हुमायू कबीर हे त्यांच्या रेजीनगर आणि नौदा या दोन्ही मतदारसंघांतून आघाडीवर आहेत. कबीर यांनी उन्नयन पार्टी नावाने पक्षाची स्थापना केली आहे. हे कबीर तृणमुल काँग्रेसला चांगलेच भारी पडले.

तृणमूलचा टक्का घसरला

या निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ होऊन ती 44.8 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर तृणमूलची मते 41.7 टक्क्यांपर्यंत घसरली आहेत. 2011 पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा कौल म्हणजे जनमताचा मोठा कौल मानला जात आहे.

3.16 कोटी महिला मतदारांवर केंद्रीत केलेले लक्ष, 25 लाख कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची दिलेली हामी, केंद्रीय निधीतून विकास कामे, 20 ते 29 वयोगटातील 1.31 कोटी मतदार 23 लाख प्रथम मतदारांना जवळ करतानाच मतदार यादीचे शुद्धीकरण करत 27 लाख मतदारांची नावे हटवून भाजपने विजयश्री खेचून आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT