West Bengal bjp news Pudhari
राष्ट्रीय

West Bengal Bjp Strategy: पश्चिम बंगाल जिकलं! भाजपची रणनिती काय होती?

West Bengal Latest News:

पुढारी डिजिटल टीम

कोलकाता: तृणमूल काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये अखेर भाजपने दमदार विजय मिळवला आहे. ममतादीदींचे 15 वर्षांचे साम्राज्य संपुष्टात आले असून भाजपने हा विजय नेमका कसा मिळवला, त्यांची रणनिती काय होती हे जाणून घेऊया...

'परप्रांतीय' मुद्दा खोडून काढला

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने भाजप हा 'बाहेरचा' (परप्रांतीयांचा) पक्ष असल्याचा प्रचार केला. सत्ताधाऱ्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताच भाजपने 'बंगाली अस्मिते'ची झलकच मतदारांना दाखवली. भाजपचे नेते बाजारपेठेत माशांवर ताव मारताना दिसले. भाजप सत्तेवर आल्यावर पश्चिम बंगालच्या जनतेच्या खाद्यसंस्कृतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा संदेशच भाजपने मतदारांना दिला.

इतकंच नव्हे पश्चिम बंगालमधील महिला मतदारांसाठी भाजपने स्मृती इराणींना मैदानात उतरवले. स्मृती इराणी या बांग्ला भाषेत संवाद साधू शकतात. सर्वसामान्य महिलांशी त्यांची संवाद साधण्याची शैली, त्यांची कार्यकर्त्यांमधील पकड ही बलस्थानं लक्षात ठेवूनच स्मृती इराणींना प्रचारात उतरवण्यात आले.

चक्रव्युहात अडकलेल्या ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जींची निवडणुकीच्या घोषणापूर्वीच एक गोष्ट चुकली होती. ममता बॅनर्जी बंगालच्या रस्त्यावर उतरुन निवडणूक आयोगाविरोधात लढल्या. SIR च्या मुद्द्यावरुन ममतांनी ही लढाई तृणमूल विरुद्ध निवडणूक आयोग अशी केली. ममता बॅनर्जींचे वर्तन, आंदोलनाच्या पद्धतीवरुन सुप्रीम कोर्टानेही ताशेरे ओढले होते. दुसरीकडे भाजपने मात्र भ्रष्टाचार, राज्यातील विकासाचा अभाव, गुन्हेगारी या मुद्द्यांवरुन सरकारला चांगलीच कोंडी गेली.

यात भर म्हणजे ममता बॅनर्जींविरुद्ध भाजपने सुवेंदू अधिकारी यांना रिंगणात उतरवले. ममता बॅनर्जींसाठी घरच्या मैदानातील लढाई प्रतिष्ठेची होती. त्या मतदारसंघातच जास्त अडकून पडल्या. ममता बॅनर्जींनी सर्व जागांवर मीच उभी आहे असे समजूनच तृणमूलच्या उमेदवाराला मतदान करा, असे भावनिक आवाहन केले. पण मतदारांनी त्याला फारशी साद दिली नाही.

भाजपचे 'चाणक्य' बंगाल मुक्कामी आणि मतांची गोळाबेरीज

अमित शाह हे तब्बल 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये मुक्कामी होते. दिवसभर प्रचारसभा, रोड शो आटोपल्यानंतर रात्री नऊ ते रात्री दोन पर्यंत अमित शाह बैठका घ्यायचे. या बैठकीत निष्ठावंत कार्यकर्त्यापासून ते जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जायच्या आणि त्यांना उपाय देखील सुचवला जायचा.

प. बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडला त्यादिवशीही अमित शाहा बंगालमधल्या भाजपच्या वॉर रुममधून लक्ष ठेवून होते.

भाजप निवडणुकांना गांभीर्याने घेते याचं उदाहरण द्यायचं झालं तर भाजपचे महासचिव सुनील बन्सल हे दोन वर्षांपूर्वीच बंगाल दौरा करून आले. पक्षाच्या जिल्हानिहाय स्थितीचा त्यांनी आढावा घेतला आणि संघटनात्मक पातळीवर काय बदल करावे लागतील याचा अहवाल दिला होता.

सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष आणि समिक भट्टाचार्य या भाजपच्या प. बंगालमधील निष्ठावंतांची फौज शाहांसोबत होती.

पोलिंग एजंटसाठी पक्षाने लेखी आणि तोंडी परीक्षाही घेतल्या. अमित शाहांनी सीमावर्ती भागातील जिल्हे आणि औद्योगिक भागात भर दिला कारण त्या जागा भाजपसाठी अनुकूल होत्या.

3 जागा ते बहुमत- भाजपचा प्रवास

मोदी सरकारला दोन वर्ष होत असताना पार पडलेल्या 2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प.बंगालमधील 294 जागांपैकी भाजपला फक्त तीन जागांवर विजय मिळाला होता. तर 2021 मध्ये भाजपने 77 जागांवर मुसंडी मारली होती. तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपने तब्बल 205 जागांवर आघाडी घेतली होती. आंदोलनाच्या हेडलाईन्सवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या तृणमूलला भाजपने शिस्तबद्ध नियोजनाने जोरदार दणका दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT