राष्ट्रीय

Weekend curfew in Delhi : दिल्लीत ५५ तासांचा ‘कर्फ्यू’ , रेल्वे, विमान प्रवास करणाऱ्यांना संचारबंदीतून सूट

नंदू लटके

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा
राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने शुक्रवारी रात्री १० वाजतापासून सोमवारी सकाळपर्यंत ५५ तासांचा 'कर्फ्यू' ( Weekend curfew in Delhi ) लावण्यात आला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि थंडीमुळे शनिवारी सकाळपासूनच राज्यातील रस्त्यांवर कमी वर्दळ बघायला मिळाली. अत्यंत आवश्यक कामासाठीच दिल्लीकरांनी घराबाहेर पडणे पसंत केले. रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अत्यंत व्यस्त अशा 'जनपथ' बाजारात देखील शुकशुकाट दिसून आला. रेल्वे, विमान प्रवास करणाऱ्यांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.

Weekend curfew in Delhi : …तरच घराबाहेर पडण्यास परवानगी

आपत्कालीन स्थितीतच लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाहेर पडणाऱ्यांना सरकारकडून जारी करण्यात आलेले ई-पास तसेच वैध ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाजार,रस्ते,कॉलनी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी कडक पाळत ठेवण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास पथकांची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले.

जर कुठल्या महत्वपूर्ण कामासाठी बाहेर जायचे असल्यास कुठल्याही आवश्यक श्रेणीत न येणार्यांना दिल्ली सरकारकडून ई-पास घेणे आवश्यक राहील. अशात नागरिकांना ई–पास साठी दिल्ली सरकारच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. न्यायाधीश, न्याय अधिकारी, न्यायालयाचे कर्मचारी, पत्रकार तसेच वकीलांना वैध ओळखपत्र, सेवा ओळखपत्र, फोटो प्रवेश पास तसेच न्यायालयाकडून जारी करण्यात आलेले परवानगी पत्र दाखवून प्रवास करण्याची परवानगी राहील.

डॉक्टर, परिचारक, वैद्यकीय कर्मचारी तसेच रूग्णालये, प्रयोगशाळा, क्लिनिक, औषधालये, औषध कंपन्या तसेच वैध ओळखपत्र दाखवून वैद्यकीय ऑक्सिजनची पूर्तता करणाऱ्यांना संचारबंदीतून वगळ्यात आले आहे.विमानतळ, रेल्वे स्टेशन तसेच आंतरराज्यीय बस स्थानकांवरून येजा करणार्या प्रवाशांना वैध प्रवास तिकिटासह शहरांतर्गत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Weekend curfew in Delhi : 'डीडीएमए'च्या निर्देशांनुसार दिल्ली मेट्रोत बदल

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (डीडीएमए) निर्देशांनुसार दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी)'विकेंड'ला मेट्रोच्या संचालनात बदल केले आहे. शनिवारी-रविवारी ब्लू तसेच येलो लाईन वर दर १५ मिनिटांनी तसेच उर्वरित सर्व लाईन्सवर २० मिनिटांच्या अंतरावर मेट्रो धावेल. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सर्व लाईन्सवर १००% क्षमतेने मेट्रो संचालित केली जाईल. संचारबंदीमुळे मेट्रो सेवेचा लाभ केवळ आपत्कालीन सेवेशी निगडीत दिल्लीकरच घेवू शकतील.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT