तिरुअनंतपुरम | Wayanad landslides updates : वायनाडमध्ये अक्राळविक्राळ भूस्खलनानंतर चूरामला येथे संपर्क तुटलेल्या मुंदकाईपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी तातडीने पूल उभारणे गरजेचे होते. लष्कराच्या मद्रास सॅपर्सची ७० जणांची टीम या कामाला लागली. ३१ तासांच्या अविश्रांत श्रमानंतर हा बेली पूल उभारण्यात आला आणि मुंदकाईपर्यंत बचाव व मदत करणाऱ्यांना धाव घेता आली. मद्रास सॅपर्सच्या या टीमचे नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या मेजर सीता अशोक शेळके यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
मूळच्या अहमदनगरच्या असलेल्या मेजर सीता शेळके या २०१२ मध्ये लष्करात दाखल झाल्या. त्यांनी चेन्नईच्या लष्कराच्या मुख्यालयात प्रशिक्षण घेतले. त्यांची नियुक्ती लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप अर्थात मद्रास सॅपर्समध्ये झाली. अवघड व दुर्गम भागात लष्कराला पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम या सॅपर्सकडे असते. याच तुकडीला वायनाडला बोलावण्यात आले होते. कारण होते मुंदकाईला पोहोचण्याचे. मुंदकाईवर शब्दशः आभाळ कोसळले होते. डोंगराचा मोठा भाग या गावावर पडला. गावात जाण्यासाठीचा पूलही या प्रलयात वाहून गेला. त्यामुळे जगाशी संपर्क तुटला. मदत व बचाव कामासाठी तेथे जाण्याची कोणतीच सुविधा नसताना मद्रास सॅपर्सने हे काम हाती घेतले.
मेजर सीता शेळके यांनी आपल्या टीमसोबत २१ तास क्षणभरही विश्रांती न घेता १९ पोलादी पॅनल्सच्या मदतीने हा पूल उभारला. पूल तयार झाला आणि त्यावरून बुलडोझर, सीबीसारखी अवजड यंत्रसामग्री, रुग्णवाहिका तातडीने मुंदकाईकडे रवाना झाला. मेजर सौता शेळके यांची पुलाची उभारणी करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रकाशित झाली आणि त्या केवळ केरळातच नव्हे तर संपूर्ण देशात हिरो ठरल्या. नेटकऱ्यांनी मेजर सीता यांना वाघीण अशी उपमा देत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले.
७० जणांच्या टीमची अविस्मरणीय कामगिरी
३१ तासांच्या अविश्रांत श्रमानंतर साकारला पूल
१९ पॅनलच्या पुलामुळे जाऊ शकली मुंदकाईला वाहने