waterlogging outside mp ravi kishans residence amidst torrential rain goes viral
पुढारी ऑनलाईन : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोरखपूर शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. खासदार रवी किशन यांच्या रामगढताल परिसरातील घराबाहेरही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. शहरातील बिघडलेल्या परिस्थितीवरून काही लोकांनी ‘स्पेन-स्पेन’च्या घोषणा देत उपरोधीक टिका केली.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये सलग सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक भागांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. यादरम्यान गोरखपूरचे खासदार रवि किशन यांच्या रामगढताल लेक व्ह्यू लेन येथील घराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे त्यांच्या घरासमोरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
व्हिडिओमध्ये रवी किशन यांच्या घराबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी गोरखपूरची ‘स्पेन’शी तुलना करत उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच खासदारांच्या घराजवळून जाणारे काही स्थानिक नागरिकही ‘स्पेन-स्पेन’ असे म्हणत मजा करताना दिसत आहेत.
गोरखपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. पावसानंतर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. काही ठिकाणी रस्ता आणि साचलेल्या पाण्यात फरक करणेही कठीण झाले. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवरही परिणाम झाला. जलभरावामुळे अनेक भागांतील वाहतूकदेखील विस्कळीत झाली.
दरम्यान, पावसाच्या परिस्थितीत खासदार रवि किशन हेही शहराची पाहणी करण्यासाठी रात्री बाहेर पडले. त्यांच्यासोबत गोरखपूरचे डीएम दीपक मीणा, नगर आयुक्त अजय जैन आणि महापौर डॉ. मंगलेश श्रीवास्तव उपस्थित होते. या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये जाऊन जलभरावाच्या परिस्थितीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी प्रभावित भागांचा आढावा घेतला. सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा करण्याबाबत प्रशासन आणि नगर निगमच्या पथकांवरील दबाव वाढला आहे.
गोरखपूरची ‘स्पेन’शी केली होती तुलना
रवि किशन यांच्या घराबाहेरील जलभरावाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ‘स्पेन’वरून विविध कमेंट्स केल्या जात आहेत. यासोबतच रवी किशन यांनी यापूर्वी गोरखपूरची ‘स्पेन’शी केलेली तुलना असलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला जात आहे.
वास्तविक, गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी एका कार्यक्रमात मंचावरून भोजपुरी भाषेत गोरखपूरबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, ‘हमके लागेला स्पेन, हमके लागेला ये अद्भुत जगह. हमको स्मार्ट सिटी लागत बा...’
गोरखपूरच्या विकासाचे कौतुक करताना त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, शहरातील हा बदल ज्यांना दिसत नाही, ते ‘आंख के अंधे’ आहेत. त्यांचे हे वक्तव्य ऐकून मंचावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही हसू आवरता आले नव्हते. त्यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्याची मोठी चर्चा झाली आणि त्यावरून ट्रोलिंगही करण्यात आले.
नगरसेवकाने रवि किशन यांच्यावर साधला निशाणा
गोरखपूरमध्ये पावसानंतर निर्माण झालेल्या पाणी भरल्याच्या समस्येवरून बेतियाहाता वॉर्डचे नगरसेवक विश्वजीत त्रिपाठी यांनी खासदार रवि किशन यांना फोन केला. या संभाषणादरम्यान रवि किशन यांनी नगरसेवकांना विचारले, ‘सपा जॉइन कई लिहला का?’
यावर विश्वजीत त्रिपाठी यांनी पलटवार करत विचारले, ‘सांसद जी, बसपा जॉइन कर ली क्या?’ या दोघांमधील संभाषणाचा व्हिडिओही समोर आला आहे. विश्वजीत त्रिपाठी यांनी यापूर्वी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर नगरसेवकाची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
विश्वजीत त्रिपाठी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ते रामगढतालच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असल्याचे दिसत आहे. संभाषणादरम्यान रवि किशन यांनीही आपण रामगढताल परिसरात असल्याचे सांगितले होते, असा दावा नगरसेवकाने केला. यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, खासदारही त्याच परिसरात उपस्थित होते, तर ते दिसत का नव्हते?