Delhi Blast CCTV: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाचा नवीन CCTV फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओत दिसतंय की कशाप्रकारे चालत्या गाड्यांच्या मध्येच एका कारमध्ये स्फोट झाला, आणि काही सेकंदांतच परिसर धुरानी व्यापला. फुटेजमध्ये एक पांढरी i20 कार पार्किंगमधून बाहेर पडताना दिसत आहे आणि काही क्षणांतच ती अचानक हवेत उडते.
चांदणी चौक परिसरातील CCTV कंट्रोल रूममध्ये या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. फुटेजमध्ये लाल किल्ल्याच्या गेटजवळील परिसर स्पष्ट दिसत आहे. संध्याकाळच्या 6 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास घडलेला हा स्फोट चार वेगवेगळ्या कॅमेर्यांमध्ये कैद झाला.
व्हिडिओत स्फोटाच्या आधी परिसरात नेहमीप्रमाणे गर्दी आणि वाहनांची ये-जा दिसते. पण काही सेकंदांतच एक जोरदार आवाजासह गाडी स्फोटाने हवेत उडते, आणि लोकांच्या आवाजाने वातावरण हादरून जातं.
ही घटना सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या NIA आणि दिल्ली पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणा करत आहेत. आतापर्यंत 20 संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि देशातील विविध भागांत सतत छापेमारी सुरू आहे.
मृतांच्या पोस्टमॉर्टेममध्ये अत्यंत भीषण जखमा आढळल्या आहेत. अनेकांच्या कानाचे पडदे, फुफ्फुसे आणि आतडी स्फोटाच्या धक्क्याने फाटली आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं. काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी रुग्णांनी रुग्णालयात प्राण गमावले.
मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या शवगृहात आतापर्यंत 8 मृतांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना सुपूर्द केले आहेत. काही शवांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेनंतर दिल्लीतील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल किल्ला, संसद भवन, आणि इतर महत्त्वाच्या सरकारी इमारतींच्या परिसरात हाय अलर्ट जारी केला गेला आहे. फॉरेन्सिक टीम्स आणि NIAच्या टीम्सने स्फोटाच्या ठिकाणाहून स्फोटकांचे नमुने आणि कारचे तुकडे जप्त केले आहेत. प्राथमिक तपासानुसार, हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.