Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: मुलगाच पाहिजे! पोटात मुलगी असल्याच्या संशयावरून पतीने गरोदर पत्नीसह दोन मुलींना संपवले

पत्नी पुन्हा मुलीलाच जन्म देईल, या संशयातून पतीने पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crime News

आंध्रप्रदेश: पत्नी पुन्हा मुलीलाच जन्म देईल, या संशयातून पतीने पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्रप्रदेशच्या हणमकोंडा जिल्ह्यातील पुन्नोले गावात गुरुवारी सकाळी एका खासगी स्विमिंग पूलमध्ये महिला आणि तिच्या दोन निष्पाप मुलींचे मृतदेह आढळले.

फरहाना (वय २६) आणि तिच्या दोन मुली उमेरा (वय ९) व आयेशा (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. मोहम्मद अझरुद्दीन असे संशयित आरोपीचे नाव आहे. मोहम्मद याने बुधवारी रात्री आपल्या एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचे निमित्त काढून पत्नी आणि मुलांना गावाबाहेरील आपल्या शेतात नेले होते. तेथे सर्वांनी मिळून जेवण केले. तिथे एक स्विमिंग पूल आहे. मध्यरात्री अझरुद्दीनने तिघींची हत्या करून त्यांचे मृतदेह स्विमिंग पूलमध्ये फेकले आणि गुरुवारी सकाळी हा एक अपघात असल्याचे सांगून नातेवाईकांना कळवले.

गर्भपातासाठी दबाव आणि छळ

फरहानाचे वडील शेख अली यांनी आरोप केला की, त्यांचा जावई मोहम्मद अझहरुद्दीन याने पत्नी व दोन्ही मुलींना स्विमिंग पूलमध्ये ढकलून त्यांचा खून केला आणि अपघात असल्याचे सांगितले. अझरुद्दीनला मुलगा हवा होता. फरहाना सध्या पाच महिन्यांची गरोदर होती आणि पोटात वाढणारे बाळ पुन्हा मुलगीच असेल, असा संशय अझरुद्दीनला होता. याच कारणावरून तो फरहानाचा छळ करत होता. यापूर्वीही त्याने फरहानाचे दोन वेळा बळजबरीने गर्भपात घडवून आणले होते, असेही अली यांनी सांगितले.

घटनेनंतर पती फरार

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा तिघींचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले. पर्वथगिरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे. पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT