वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे असा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला आहे.  Pudhari Photo
राष्ट्रीय

वक्फ विधेयक : संयुक्त संसदीय समिती अध्यक्षांकडून उल्लंघन, विरोधकांचा आरोप

Waqf Bill | अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी आरोप फेटाळले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत सत्ताधारी खासदार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद होत आहेत. संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी बैठकीतील घटनांवर सार्वजनिक वक्तव केले असून त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. असा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला आहे. याआधीही विरोधकांनी अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती.

संयुक्त संसदीय समितीच्या विरोधी सदस्यांनी म्हटले आहे की, अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काचेची बाटली फोडून त्यांच्यावर फेकल्याची घटना सार्वजनिक करून प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यानंतर जगदंबिका पाल यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, द्रमुक पक्षाचे खासदार ए.राजा आणि आपचे खासदार संजय सिंह यांनी केलेले आरोप निराधार आहेत. समितीची कार्यवाही सार्वजनिक करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट बैठकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत त्यांनी भाष्य केले आहे. मी नेहमीच संसदीय कार्यपद्धतीचे नियम पाळले आहेत आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखली असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संयुक्त समितीचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी मंगळवारी पॅनेलच्या बैठकीत एका सदस्यासह झालेल्या हिंसाचाराच्या घटना आणि त्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत निवेदन दिले.

दरम्यान, ए राजा आणि संजय सिंह यांनी जगदंबिका पाल यांचे कल्याण बॅनर्जी यांच्याविषयीचे माध्यमांसमोरचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. भाजपचे खासदार जगदंबिका पाल घाईघाईने समितीच्या बैठका आयोजित करत असल्याचा आरोप द्रमुक खासदाराने केला. अशी घाई संशयाला जन्म देते. त्यामुळे न्याय मिळण्याची आशा कमी होते, असा आरोप द्रमुक खासदार ए.राजा यांनी केला. ए.राजा म्हणाले की, आपण आपली लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, बॅनर्जी यांचे वर्तन केवळ संसदीय परंपरांचाच नव्हे तर संसदीय संस्था आणि संविधानाचाही अपमान आहे. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीसह काँग्रेस नेत्यांनी या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेखावत यांनी केली. ज्या लाखो मतदारांनी त्यांना बॅनर्जींना निवडून संसदेत पाठवले त्यांचाही हा अपमान असल्याचे शेखावत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT