प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

Waqf Amendment Act case| 'वक्फ'वरील सुनावणीवेळी 'खजुराहो'चा उल्लेख! सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्‍हणाले?

सुनावणीदरम्यान ॲड. कपिल सिब्बल यांनी केला प्राचीन स्थळांचा दाखला

पुढारी वृत्तसेवा

Waqf Amendment Act case : वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज (दि.२० मे) सरन्‍यायाधीश भूषण गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर पुन्‍हा सुनावणी सुरु झाली आहे. सुनावणीदरम्यान ज्‍येष्‍ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्राचीन स्थळांबाबतही युक्तिवाद केला. यावर सरन्‍यायाधीश भूषण गवई यांनी खजुराहो मंदिराचा दाखला दिला. जाणून घेवूया आजच्‍या सुनावणीत नेमकं काय झालं याविषयी...

वक्फ मालमत्ता हस्तांतरित करता येत नाही : ॲड. सिब्‍बल

याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, वक्फ (दुरुस्ती) कायद्याद्वारे सरकार फक्त वक्फ मालमत्ता ताब्यात घेऊ इच्छित आहे. वक्फ म्हणजे धर्माला समर्पण केलेली मालमत्ता मानली जाते. त्‍यामुळे तिचा वापर बदलता येत नाही. वक्फ मालमत्ता हस्तांतरित करता येत नाही. एकदा मालमत्ता वक्फ झाली की ती कायमची वक्फ राहते. ते बदलणे शक्य नाही.

मशिदी व कब्रस्तानांकडे हजारो कोटींची संपत्ती नसते

वक्फ कायदा वक्फच्या संरक्षणासाठी आहे; पण प्रत्यक्षात वक्फच्या ताब्यासाठी वापरला जात आहे. कायदा अशा पद्धतीने बनवला आहे की कोणतीही प्रक्रिया न पाळता वक्फ मालमत्ता काढून घेता येईल. निर्णय घेणारा अधिकारी हा सरकारी अधिकारीच आहे आणि एकदा निर्णय झाला की ती मालमत्ता वक्फ राहत नाही. वक्फ म्हणजे काय? तो अल्ला/ईश्वरासाठी केलेला अर्पण आहे. हे अर्पण कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. राज्य मशीद चालवण्यासाठी पैसे देऊ शकत नाही, स्मशानभूमीसाठी खाजगी मालमत्तेचा वापर होतो. त्यामुळे अनेक लोक मृत्यूपूर्वी आपली मालमत्ता वक्फ म्हणून अर्पण करतात. मंदिरेत चढावा नसतो. मशिदी व कब्रस्तानांकडे हजारो कोटींची संपत्ती नसते, असाही युक्‍तीवाद सिब्‍बल यांनी केला.

सरन्यायाधीश गवई यांनी खजुराहो मंदिराचा उल्लेख का केला?

सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी प्राचीन स्थळांबाबतही युक्तिवाद केला. ते म्हणाले की, अशा काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या सरकारी नियंत्रणाखाली घेतल्या गेल्या तरीही त्यांचा वक्फ दर्जा रद्द करण्यात आला नव्हता. आता जर कोणत्याही वक्फ मालमत्तेला स्मारकाचा दर्जा मिळाला तर ती वक्फ मानली जाणार नाही; मग एकदा वक्फचा दर्जा रद्द झाला की, लोकांना नमाज अदा करण्यापासून बंदी घातली जाईल. अशाप्रकारे मुक्तपणे उपासना करण्याच्या अधिकारावर परिणाम होईल, असा युक्‍तीवाद सिब्‍बल यांनी केला. यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्‍पष्‍ट केले की, सरकारी नियंत्रणाखाली आल्याने पूजा करण्याचा अधिकार प्रभावित होईल, असे नाही. खजुराहो सध्या संरक्षित स्मारक आहे. तरीही सामान्य लोक तिथल्या मंदिरात जाऊन पूजा करू शकतात, असे स्‍पष्‍ट करत मुक्तपणे उपासना करण्याच्या अधिकारावर भाष्‍य केले.

खजुराहो ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून जगप्रसिद्ध ठिकाण

खजुराहो हे मध्यप्रदेश राज्यातील छत्तरपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून जगप्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण खजुराहो मंदिर समूहासाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोने त्‍याचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला आहे. खजुराहो मंदिरेही त्यांच्या अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. ही मंदिरं मंदिरं खडकात कोरून बनवलेली आहेत आणि अत्यंत बारकाईने शिल्पकला साकारलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT