नवी दिल्ली : वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, असा घणाघात रा. स्व. संघाचे संयोजक इंद्रेश कुमार यांनी केला आहे. सध्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन देशात वाद-प्रतिवाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कुमार यांनी तोफ डागली आहे.
आपल्या देशात कुठल्याही जमिनीबाबत न्यायालये निर्णय घेतात. आता वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा मुद्दा उपस्थित झाला असून त्याचा निवाडा वक्फ बोर्डच करणार, असे कसे चालेल? अनेक मालमत्तांवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवण्यात आल्याचेही दिसते, असे इंद्रेश कुमार म्हणाले
वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकात अनेक बदल करण्यात आले आहेत. यातील एका तरतुदीनुसार राज्य सरकारांना, बिगर मुस्लिम व्यक्तींना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दोन बिगर मुस्लिम सदस्य राज्य सरकारने नियुक्त करावेत असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात असाही प्रस्ताव आहे की, वक्फची संपत्ती कुठली आणि सरकारी संपत्ती किंवा मालमत्ता कुठली हे ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकार्याकडे असेल.
मुस्लिमधर्मीय सोडून इतर धर्माच्या लोकांनीही वक्फ बोर्डाकडे जमिनी दिल्या आहेत तर मग वक्फ बोर्डात इतरधर्मीयांना प्रतिनिधित्व का द्यायचे नाही? वक्फ बोर्डाची जबाबदारी निश्चित करणे, वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि बिगर मुस्लिम व्यक्तींची नियुक्ती करून सामाजिक सौहार्दता वाढवणे हे तीन उद्देश या सुधारणा विधेयकामागे आहेत, असेही कुमार यांनी म्हटले आहे.