

फजल मुल्ला
देगलूर : शहरात कृषक व अकृषिक अशा एकूण १ हजार ४७ गट असुन त्यातील ३८ गटातील ४२१ एकर जमिनीच्या सातबारावर आता मालमत्ता धारक भोगवटदार दोन तर भोगवटदार एकमध्ये वक्फ बोर्डाचे नाव येणार असल्यामुळे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून नागरिक गोंधळात पडले आहेत.
एकेकाळी देगलूर शहर आणि परिसरात वक्फ बोर्डाची शेकडो एकर जमीन असल्याचे बोलले जाते. आजपासून साठ, सत्तर वर्षांपूर्वी वक्फ बोर्डाची कथित जागा काही इसमांनी स्वतःचे नावे करून घेतली आणि ज्यांना जमेल त्या पद्धतीने, मिळेल त्या भावाने विक्री केली. विकत घेतलेल्या शेत जमिनीवर शेतकऱ्यांनी अनेक वर्षे शेती केली. तर गेल्या कांही वर्षांपासून जुन्या देगलूर शहरात लोकसंख्या वाढून तेथील जागा राहण्यास अपुरी पडत असल्यामुळे अनेक नागरिकांनी स्वतःच्या शेतात घरे बांधली. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या निकडीच्या आर्थिक गरजेपोटी जमीन विकली. या जमिनीचे शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून एनए, ले आउट करून कांही नागरिकांनी प्लॉट करून विकले. या प्लॉटवर अनेकांनी घरे बांधली. कांही घरे सध्या बांधली जात आहेत.
जवळपास चाळीस पन्नास वर्षांपासून या जमिनीवर, प्लॉटवर घरे बांधण्यात आली आहेत. अगदी सुरुवातीस घराचे बांधकाम केलेल्या पिढीतील बहुतेक सर्व नागरिक सध्या हयात नाहीत. काही प्लॉटची तीन-तीन, चार-चार वेळा विक्री झाली असून अनेक प्लॉट मालक, घरमालक हे चौथे, पाचवे ताबेदार आहेत. अशा परिस्थितीत तहसील कार्यालयाकडून सर्व प्लॉट धारकांना ते राहत असलेल्या घरांची, दुकानांची, कार्यालयाची जागा वक्फ बोर्डाची असून लवकरच सर्वांच्या सातबारावर मुळ मालकासह वक्फ बोर्डाचीही नोंद करण्यात येणार असल्याचे कळविण्यात येत आहे.
शहरातील गट क्रमांक १३८ ते १४८, गट क्रमांक १९९, २१२, २९१, २९४, २९५, ३२६, ३३०, ३३१, ३३३, ३४३ ते ३४९, ३६०,४०७, ४१४, ४१५, ४१७, ४१८, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१५ अशा एकूण ३८ गटांतील एकूण ४२१ एकर जमिनीच्या सातबारावर ही नोंद करण्यात येणार असल्याचे वक्फ बोर्डाच्या आदेशानुसार समजते. भोगवटादार १ च्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव येणार व भोगवटदार वर्ग दोन मध्ये मालमत्ता धारकाचे नाव येणार असल्याचे समजताच गेल्या अनेक वर्षापासून कर्ज काढून घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
वक्फ बोर्डाची नोंद झाल्यामुळे अशा एकूण ३८ गटातील जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प पडणार आहेत. एवढेच नव्हे तर या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिक 'त्यांना घरातून बाहेर काढले जाते की काय? या भीतीने ग्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या शेतजमिनीचे एन ए, लेआउट करून अधिकृतपणे उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून खरेदी विक्री होत असताना, नगरपरिषदेच्या दप्तरी अधिकृतपणे नोंद होऊन मालकी हक्क प्रमाणपत्र दिले जात असताना इतके वर्ष प्रशासन झोपीत होते की काय? असा खडा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.
सदरील जमिनीच्या संदर्भात वक्फ बोर्डाचे पत्र आलेले असून त्या पत्रातील नमूद सर्व्हे नंबरचे भोगवटदार एकचे रूपांतर भोगवटदार दोन मध्ये करण्यात आले. संबधित सातबाऱ्यावर वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्यात आली.
ज्ञानेश्वर रातोळीकर, तलाठी देगलूर