Lucknow-Kanpur Expressway Repair Viral Video file photo
राष्ट्रीय

Viral Video : ४,२०० कोटींच्या AI एक्स्प्रेसवेची थट्टा? रस्ता वाळवण्यासाठी चक्क लावले पंखे; VIDEO व्हायरल

Lucknow-Kanpur Expressway Repair Viral Video: तब्बल ४,२०० कोटी रुपये खर्च केलेला लखनऊ-कानपूर एक्स्प्रेसवेवर सध्या चांगलाच चर्चेत आहे. खराब झालेला रस्ता दुरुस्तीसाठी चक्क पंख्यांच्या मदतीने सुकवला जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Lucknow-Kanpur Expressway Repair Viral Video:

लखनऊ: तब्बल ४,२०० कोटी रुपये खर्च केलेला लखनऊ-कानपूर एक्स्प्रेसवेवर सध्या चांगलाच चर्चेत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या २० दिवसांतच हा रस्ता पाच वेळा खचला. यापेक्षाही अधिक चर्चा सुरू आहे ती रस्त्याच्या दुरूस्तीची. खराब झालेला रस्ता दुरुस्तीसाठी चक्क पंख्यांच्या मदतीने सुकवला जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही व्हिडिओ शेअर करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली असलेल्या पहिल्या एक्स्प्रेसवेपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मार्गावर उद्घाटनानंतर काही दिवसांतच अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर कंत्राटदार कंपनीने नुकसानग्रस्त भाग दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. दरम्यान, दुरुस्ती सुरू असलेल्या उन्नाव-लखनऊ मार्गावरील सुमारे ३०० मीटरच्या भागात एक डझनच्या आसपास पेडेस्टल पंखे लावून बांधकाम साहित्य आणि रस्त्याचा भाग लवकर वाळवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

सततच्या पावसामुळे दुरुस्तीला अडथळा

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नुकसान झालेल्या भागात पुन्हा सब-बेस आणि बाइंडिंग मटेरियल भरल्यानंतर त्यावर बिटुमिन आणि डांबराचा थर टाकायचा होता. मात्र, सततच्या पावसामुळे साहित्य वाळत नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले. त्यामुळे बुधवारी सकाळी कामाचा वेग वाढवण्यासाठी पंख्यांचा वापर करण्यात आला. मात्र, दुरुस्ती झालेल्या भागाच्या आसपास पुन्हा नवीन भेगा पडू लागल्याची माहितीही समोर आली आहे.

वाहतुकीवर परिणाम, कोंडी वाढली

१३ जुलै रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेल्या या एक्स्प्रेसवे खराब झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दुरुस्तीमुळे सुमारे ६ किलोमीटरपर्यंत दोन्ही दिशेची वाहतूक एकाच मार्गिकेवरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी वाढत असून वाहनांचा वेगही मंदावला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कंत्राटदार कंपनीवर कारवाई करणार?

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार कंपनीला शुक्रवार सकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने करण्याचे आदेश देण्यात आले असून, काम पूर्ण होईपर्यंत एक्स्प्रेसवेवरील वापरकर्त्यांकडून टोल आकारला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वीही प्राधिकरणाने संबंधित कंपनीविरूद्ध निकृष्ट कामाबाबत कारवाई सुरू केली होती. कंपनीला 'नॉन-परफॉर्मिंग' घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दंडही ठोठावण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंख्यांव्यतिरिक्त घटनास्थळी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ताडपत्री, एअर-ड्रायिंग मशिन्स आणि उच्च क्षमतेची रस्ता स्वच्छता उपकरणे देखील वापरण्यात येत आहेत. मात्र, पंख्यांच्या वापराचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाच्या दर्जाबाबत आणि देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT