Kerala Driver Sleeping In Car Viral Video Pudhari
राष्ट्रीय

Video Viral: भररस्त्यात कार थांबवली अन् चालक गाढ झोपला; हॉर्न वाजवला, गाडी हलवली तरीही जाग आली नाही, शेवटी पोलीस आले अन्...

Kerala Driver Sleeping In Car Viral Video: केरळमधील कोट्टयम येथे एका चालकाने भररस्त्यात कार थांबवून गाढ झोप घेतल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

पुढारी वृत्तसेवा

Kerala Driver Sleeping In Car Viral Video: केरळमधील कोट्टयम येथे एक अजब घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कारचालकाने भररस्त्यात कार थांबवली आणि कारमध्येच गाढ झोपून गेला. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, लोकांनी हॉर्न वाजवले, चालकाला आवाज दिला, इतकेच नव्हे तर कार हलवूनही त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो बराच वेळ गाढ झोपेतच होता.

भररस्त्यात कार थांबली अन् वाहतूक ठप्प

व्हायरल व्हिडिओनुसार, ही घटना कोट्टयम जिल्ह्यातील अथिरांपुझा पल्ली जंक्शन परिसरात घडली. अथिरांपुझा-एट्टुमानूर रस्त्यावर एका चालकाने आपली लाल रंगाची कार रस्त्याच्या मधोमध थांबवली.

रस्त्याच्या मधोमध कार उभी राहिल्याने वाहतूक कोंडी झाली. सुरुवातीला इतर वाहनचालकांनी हॉर्न वाजवून चालकाला कार बाजूला घेण्याचे संकेत दिले. मात्र, कारमधून कोणतीही हालचाल झाली नाही.

हाका मारल्या, गाडी हलवली; तरीही चालक जागा झाला नाही

वाहतूक वाढू लागल्यानंतर काही लोक कारजवळ जमा झाले. त्यांनी कारमधील चालकाला हाका मारल्या. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर काही नागरिकांनी चालकाला जागे करण्यासाठी कार हलवून पाहिली.

मात्र, एवढे करूनही चालक बराच वेळ जागा झाला नाही. तो इतका गाढ झोपला होता की कार हलवल्यानंतरही त्याला जाग आली नाही. त्याच्या एका कानात इयरफोनही असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा प्रकार पाहून सुरुवातीला नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली. चालकाला अचानक काही वैद्यकीय त्रास झाला असावा, तो बेशुद्ध झाला असावा किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या निर्माण झाली असावी, अशी शंका काहींना आली. त्यामुळे अखेर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी कार उघडली, चालकाला झोपेतून जागे केले

पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कार उघडण्यात आली आणि चालकाला झोपेतून जागे करण्यात आले. त्यानंतर कारमध्ये मद्याच्या बाटल्या आणि सोडा आढळल्याचे समोर आले. यानंतर या संपूर्ण प्रकारामागचे कारण स्पष्ट झाल्याची चर्चा सुरू झाली.

स्थानिक वृत्तांनुसार, या चालकाचे नाव जोबिन जॉनी असून तो कोट्टयम जिल्ह्यातील कंगाझा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी चालकासह कारही ताब्यात घेतली आहे. त्याच्याविरोधात मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या संपूर्ण घटनेदरम्यान काही नागरिकांनी व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

काहींनी चालकावर टीका केली आहे. मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालवणे धोकादायक असून, तो कार चालवत असताना झोपला असता तर मोठा अपघात घडू शकला असता, असे अनेकांनी म्हटले आहे.

तर काही नेटकऱ्यांनी या घटनेकडे विनोदी दृष्टीने पाहत चालकाच्या गाढ झोपेची मजा घेतली. ‘झोप असावी तर अशी’, ‘दारू प्यायलेला माणूस कुठेही झोपू शकतो’, अशा मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT