viral video : ताई आणि बहीण हे दोन शब्दांचा समानार्थी शब्द म्हणजे विश्वास आणि सुरक्षितता. नात्याने भाऊ म्हटला की, बहिणीच्या काळजी घेणे ही भावाची पहिली जबाबदारीच असते. म्हणूनच भाऊ-बहीण हे नाते रक्ताचं असो की मानलेलं जगातले सर्वात पवित्र नातं मानलं जाते. आता हे सारं सांगण्याचे कारण म्हणजे बंगळूरुच्या एका महिलेने प्रवासातील तिचा एका अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला. या हृदयस्पर्शी प्रसंगाने इंटरनेटवर बाजी मारली.
बंगळूर येथील योगिता राठोड यांनी इंस्टाग्रामवर आयुष्यातील "सर्वात प्रिय अनुभवांपैकी एक" असे वर्णन करणारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिवसभरातील शूटिंगच्या दीर्घ कामानंतर प्रवासासाठी कॅबने विमानतळावर निघाले होते. एका मैत्रिणीचा फोन आला. तिला सांगितले की, दिवसभर काहीही खाल्ले नाही. फ्लाईट पहाटे २ वाजताची असल्याने आणि विमानतळ शहरापासून खूप दूर असल्याने जेवणासाठी वेळ मिळणार नाही अशी भीती वाटत आहे.
योगिता या फोनवर बोलत होत्या. तेव्हा कॅब ड्रायव्हरने वॉशरूम ब्रेक हवा म्हणून गाडी थांबवली. मात्र परत येताच त्यांच्या हातात एक बॉक्स होता. ड्रायव्हरने सॅडविच बॉक्स योगिता यांच्याकडे देत शांतपणे म्हणाला की, "तुम्हाला मगाशी मैत्रिणीबरोबर बोलताना ऐकले. तुम्ही खूप भूक लागली असल्याचे सांगितले. मला वाईट वाटले. या ठिकाणी माझी बहीण असती आणि तिलाही भूक लागली असती तरी मलाही तसेच वाटले असते.तसेच तुम्हाला शाकाहारी हवे असल्याचेही तुम्ही म्हणाला. त्यामुळे तुमच्यासाठी मी सॅडविच घेऊन आलो."
अचानक घडलेल्या या हृदयद्रावक प्रसंगाने योगिता राठोड भारावून गेल्या. हा क्षण मी माझ्या आयुष्यात नेहमीच लक्षात राहिल. दयाळूपणाची एक साधी कृती किती मोठी असते. जगताना प्रत्येकाला स्वतःचे संघर्ष असतात पण जेव्हा शक्य असेल तेव्हा अडचणीत असणाऱ्यांप्रती सहानुभूती दाखवणारी कृती नेहमीच सर्वांना प्रोत्साहित करते, असेही त्यांनी म्हटले आहे.
या हृदयस्पर्शी व्हिडिओनंतर एका बहिणीला सॅडविच देणाऱ्या ड्रायव्हरबद्दल कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. एका युजरने म्हटले आहे की, ही जाणीवपूर्वक अडचणीत असणाऱ्यांकडे लक्ष देण्याची आणि दुर्लक्ष न करण्याची कला आहे. तर एकाने म्हटले आहे की, दुसऱ्याला सुरक्षितता प्रदान करणारे पुरुष हे नेहमीच आदरास पात्र असतात. एका युजरने म्हटले की, मी तुमच्यासोबत आहे, असे देव नेहमी सांगतो याची प्रचिती देणारा प्रसंग. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.