AI Generator Image. 
राष्ट्रीय

Viral Post : हौसिंग सोसायटीच्या 'नकोश्या' लुडबुडीला तरुणीचे सडेतोड उत्तर; ठोकला ६२ लाखांचा अब्रूनुकसानीचा दावा

अविवाहित महिलांना होणार्‍या त्रासाविरुद्ध देणार कायदेशीर लढा, सोशल मीडियावर धाडसाचे कौतूक

पुढारी वृत्तसेवा

  • बंगळूरुमधील २२ वर्षीय तरुणीच्‍या फ्‍लॅटमध्‍ये हौसिंग सोसायटतील चार-पाच जणांनी प्रवेश

  • पोलिसांनाही केले पाचारण, सीसीटीव्‍हीमधून खरा प्रकार उघड

  • तत्काळ कारवाई करत दोषी सदस्यांना हौसिंग सोसायटीने पदावरून हटवले

Housing society controversy

बंगळूरु : शहर कोणतेही असो हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या अविवाहित तरुणी आणि स्‍वतंत्र राहत असलेल्‍या महिलांना अनेकदा विनाकारण जाचाला सामोरे जावे लागते. आता बंगळूरुमधील एका २२ वर्षीय तरुणीने या त्रासाविरुद्ध चक्क कायदेशीर लढा देणार आहे. अविवाहित तरुणी आणि महिलांच्‍या घरात घरात शिरून त्रास देणाऱ्या हौसिंग सोसायटीच्‍या सदस्यांवर तिने ६२ लाख रुपयांचा दिवाणी दावा ठोकला असून, तिच्या या धाडसाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्मवर पोस्‍ट शेअर करत मांडला अनुभव

तरुणीने रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला अनुभव सविस्तर मांडला आहे. तिने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, ही घटना शनिवारी रात्री घडली, जेव्हा तिच्या घरी तिचे पाच मित्र आले होते. तिथे कोणतीही मोठी पार्टी किंवा गोंगाट सुरू नव्हता; ते फक्त जेवण बनवून गप्पा मारत बसले होतो. त्याच वेळी सोसायटीतील एका सदस्याने दरवाजा ठोठावून, "येथे बॅचलर्सना परवानगी नाही, फ्लॅट मालकाला फोन लाव," असे फर्मावले. त्यावर तरुणीने "मीच या घराची मालक आहे आणि हे तुमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही," असे सुनावत दरवाजा बंद केला. यामुळे त्या सदस्याचा अहंकार दुखावला गेला.

परवानगीशिवाय घरात प्रवेश आणि वाद

काही वेळातच चार-पाच जण परवानगी न घेता तिच्या हॉलमध्‍ये शिरले. त्यांनी तरुणीवर आणि तिच्या मित्रांवर मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा खोटा आरोप केला, तसेच दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करण्याची धमकी दिली.वाद वाढल्यानंतर तरुणीच्या मित्रांनी त्या पुरुषांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, घराची झडती घेऊ पाहणाऱ्या एकाला तरुणीने थप्पडही लगावली. अखेर प्रकरण हाताबाहेर गेल्याचे पाहून सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना पाचारण केले.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचा पुरावा

पोलिस आल्यानंतर तरुणीने आपले घरचे कागदपत्र दाखवण्यास नकार दिला, कारण त्यांनी कोणताही नियम मोडला नव्हता. तरुणीने सांगितले की, सुरक्षेसाठी तिच्या वडिलांनी हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता, ज्यामध्ये या सर्व प्रकाराचे रेकॉर्डिंग झाले होते.

घरात बेकायदेशीर प्रवेश करणार्‍यांविरोधात ठोकला ६२ लाखांचा दावा

या प्रकारानंतर तरुणीने मागे न हटता सोसायटी आणि संबंधित सदस्यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. तिने सीसीटीव्ही फुटेज बिल्डर आणि सोसायटीच्या अध्यक्षांना दाखवले. त्यानंतर तत्काळ कारवाई करत दोषी सदस्यांना पदावरून हटवण्यात आले आणि प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. "आम्ही ६२ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे. ही संपूर्ण रक्कम मिळणे कठीण असले तरी, १०-१२ टक्के रक्कम मिळाली तरी ती पुरेशी असेल. तसेच, या सदस्यांनी पुन्हा कधीही माझ्याशी संपर्क साधू नये, यासाठी आम्ही 'कायमस्वरूपी मनाई हुकूम' मिळवण्यासाठी अर्ज केला आहे," असे तरुणीने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या तरुणीची पोस्ट व्हायरल होताच नेटिझन्सनी तिचे कौतुक केले आहे. "कुणीही तुमच्या घरात असे घुसखोरी करू शकत नाही, तुम्ही घेतलेला पवित्रा योग्यच आहे," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर एकाने म्हटले की, "बंगळरुला अशाच धाडसी व्यक्तीची गरज होती. अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांना आता चांगलाच धडा मिळेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT