

दिवाळी साजरी झाली. लोक कामासाठी परत आले. बर्याच लोकांची कर्मभूमी वेगळी असते आणि मूळ गाव वेगळे असते. गावी असलेले आई-वडील आणि इतर आप्तस्वकीय यांना भेटण्याची संधी दिवाळीच्या निमित्ताने मिळत असते. पुण्यासारख्या महानगरांमध्ये दिवाळीत रस्त्यांवर गर्दी कमी होती आणि एकंदरीतच शहरामध्ये सामसूम होती. याचे कारण म्हणजे लोक गावी गेले होते. पुण्यातील काही तरुणांनी गावी जाणार्या लोकांना ‘तिकडेच राहा, परत येऊ नका’ असे फलक दाखवले ज्याची फार मोठी चर्चा सोशल मीडियावर झाली. या फलकांवरून बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झालेल्या लोकांबद्दलचा राग दिसून आला. असे फलक दाखवणार्या व्यक्ती तरी मूळ पुण्याच्या आहेत का, हा मोठाच प्रश्न आहे.
खरे तर, चांगल्या संधीच्या शोधात लोक इकडून तिकडे जात असतात. भारतीय लोक मोठ्या संख्येने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड या देशांमध्ये गेल्यामुळे तिथेही हाच प्रश्न उभा राहिला. अमेरिका आणि कॅनडामध्ये भारतीय लोकांविरुद्ध मोर्चे काढण्यात आले. तिथे भारतीय लोक हे बाहेरचे होते. मुंबईत हा प्रश्न अधूनमधून उभा राहत असतो. परप्रांतातून आलेल्या लोकांना आपण बाहेरचे समजतो. इतर देशांत आपण जातो तेव्हा आपण बाहेरचे असतो. आपल्याच प्रदेशातील लोक आपल्याच एखाद्या शहरात येतात तेव्हा तेही बाहेरचे असतात. त्यामुळे नेमके घरचे कोण आणि बाहेरचे कोण, हे समजण्यास मार्ग राहिलेला नाही.
‘हे विश्वचि माझे घर’ अशी संकल्पना मांडणार्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याच लोकांना बाहेरचे समजण्याची ही भावना आली आहे. नवीन पिढीतील प्रत्येक मुलगा हा इथून पुढे फक्त भारताच नव्हे, तर जगाचा नागरिक असणार आहे. उदाहरणादाखल इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक. त्यांचे वडील रामदास सुनक यांनी 1935 मध्ये गाव सोडले तेव्हा त्यांचे गुजरानवाला हे मूळ गाव भारतात होते. आता ते पाकिस्तानात आहे. तिथून पोटासाठी रामदास आफ्रिकेतल्या नैरोबीत आले. पुढे केनियात राहिले. पुढे 1960 मध्ये सुनक कुटुंब इंग्लंडमध्ये गेले. तिथे ऋषी सुनक यांचा 1980 मध्ये जन्म झाला. नंतर ऋषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान झाले. गमतीचा भाग असा की, ते मूळचे भारतीय आहेत. तांत्रिकद़ृष्ट्या पाकिस्तानचे आहेत. आफ्रिकेचे आहेत आणि केनियाचेपण आहेत. इंग्लंडचे ते नागरिक आहेतच आणि ती त्यांची जन्मभूमीही आहे. आशिया, आफ्रिका, युरोप या तीन खंडांचे ते आहेत, शिवाय त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे ते वेगळेच.
औरंगाबाद म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरची स्थापना करणारा मलिक अंबर हा मूळचा इथिओपिया या देशाचा होता. विचार करायला गेले, तर इथून पुढच्या जगात कोणीच आतले आणि बाहेरचे असणार नाही. सगळे जगच विस्तारत चाललेले आहे, हे जेवढे लवकर लक्षात येईल तेवढे चांगले असे म्हणावे लागेल.