Bungee Jumping Viral News : जगण्यातील थरार अनुभवण्याची भूक मागील वर्षांमध्ये तरुणाईत वाढली आहे. भीतीवर मात करण्याच्या मानकियतेतून साहसी खेळ मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. त्यामुळेच बंजी जंपिंग, स्काय डायव्हिंग, पॅराग्लायडिंग आणि रॉक क्लायम्बिंगसारखे साहसी खेळ आता केवळ एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर तरुणांच्या जीवनशैलीचा एक भाग बनले आहेत. असाच बंजी जंपिंगचा थरार अनुभवणारा तरुण मृत्यूच्या जबड्यातून परतला. दोरी तुटल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे बंजी जंपिंग करताना दोर तुटल्याने येथील २३ वर्षीय सोनू कुमार गंभीर दुखापत झाली. तो सुमारे ३५ मीटर (जवळपास ११५ फूट) उंचीवरून खाली कोसळला. ही घटना बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी शिवपुरी येथील 'थ्रिल फॅक्टरी' या साहसी क्रीडा पार्कमध्ये घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुटलेला दोर वर लटकत असताना, खाली पत्र्याच्या शेडवर पडलेला तरुण वेदनेने विव्हळताना दिसत आहे.
या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर प्रशासनाने या प्रकाराची दखल घेतली. टेहरी गढवालच्या जिल्हाधिकारी निकिता खंडेलवाल यांनी सांगितले की, "या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत 'थ्रिल फॅक्टरी'तील सर्व साहसी खेळांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, साहसी खेळांमध्ये सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांचे सुरक्षा ऑडिटही केले जात आहे."
जखमी झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणाचा तपास उत्तराखंडच्या टेहरी गढवाल जिल्ह्यातील मुनि की रेती पोलीस ठाण्यातील अधिकारी करत आहेत. डॉक्टरांकडून परवानगी मिळाल्यावर जखमी तरुणाचा जबाब नोंदवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.