Udaipur Violence 
राष्ट्रीय

Udaipur Violence | 'लिंबू'वरून वाद! दोन समुदाय भिडले, तलवारीने हल्ला, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

काही क्षणात परिस्थिती बिघडली, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात, नेमकं काय घडलं

दीपक दि. भांदिगरे

Udaipur Violence

राजस्थानमध्ये एका किरकोळ कारणावरुन दोन समुदाय एकमेकांशी भिडल्याची घटना समोर आली आहे. उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्थानक परिसरात गुरुवारी संध्याकाळी उशिरा किरकोळ वादाचे पर्यावसन मोठ्या हाणामारीत झाले. लिंबू खरेदी विक्री व्यवहारावरुन दोन तरुणांमध्ये वाद झाला. ज्याचे पर्यावसन हळूहळू दोन समुदायांमधील भांडणात झाले. यामुळे काही वेळातच येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली. हे प्रकरण नंतर हिंसाचारापर्यंत पोहोचले.

या वादादरम्यान, एका समुदायातील काही तरुणांनी भाजी विक्रेत्यावर तलवारीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर, हल्लेखोरांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली. ज्यामुळे परिसरात हिंसाचार उफाळला. या घटनेचा निषेध म्हणून संतप्त लोकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेली वाहने पेटवून दिली. यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली.

या वादात जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह चार पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

या घटनेदरम्यान हिंदू समुदायातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी एकत्र आले. त्यांनी संशयितांच्या तात्काळ अटकेची मागणी करत त्यांनी निदर्शने केली. पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत लोकांना शांत केले. जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

सध्या येथील परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, या हल्ल्यादरम्यान, काही तरुण रस्त्यावरून ये-जा करताना आणि त्याच्या हातात काही शस्त्रे दिसून आली आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, या हिंसाचारानंतर पोलिस अधीक्षक योगेश गोयल रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, परस्पर वादानंतर हे प्रकरण चिघळले. सध्या घटनास्थळी शांतता असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT