विनेश फोगटने माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.  Pudhari News Network
राष्ट्रीय

विनेश उतरणार राजकीय आखाड्यात?: काँग्रेसच्या वाटेवर

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम कुस्ती सामन्यापूर्वी १०० ग्रॅम वजनामुळे बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. त्यानंतर आता विनेश राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विनेश फोगट हिने शुक्रवारी (दि. २३) माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ती काँग्रेसमध्ये सामील होऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. (Vinesh Phogat join Congress)

कोणत्या पक्षात प्रवेश करावा, हा विनेशचा निर्णय - हुडा

याबाबत हुडा म्हणाले की, काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करत असतो. खेळाडू कोणत्याही विशिष्ट पक्षाचा किंवा राज्याचा नसतो. तो संपूर्ण देशाचा असतो. विनेशने कोणत्याही पक्षात प्रवेश करावा, हा तिचा निर्णय आहे. काँग्रेस पक्षात येणाऱ्या सर्वांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. तिला काय करायचे आहे, हा तिला निर्णय घ्यायचा आहे, असे ते म्हणाले. (Vinesh Phogat join Congress)

हा विनेशचा वैयक्तिक निर्णय - मुख्यमंत्री

विनेश फोगट हिच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, हा विनेशचा वैयक्तिक निर्णय आहे. ती कोणताही निर्णय घेऊ शकते. यावर मला काहीही म्हणायचे नाही. (Vinesh Phogat join Congress)

 विनेश राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी वजन कमी करण्यात अपयशी ठरल्याने विनेशला अपात्र घोषित करण्यात आले. महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या लढतीत भाग घेण्यासाठी विनेशचे 8 ऑगस्टरोजी वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याचे आढळून आले. तिच्या अपात्रतेविरुद्ध तिचे अपील कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) ने फेटाळले. त्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. ती भारतात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत केले होते. आता ती राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT