Sonia Gandhi Book Savarkar Controversy Pudhari
राष्ट्रीय

Sonia Gandhi Book Controversy: सोनिया गांधींच्या पुस्तकातील दोन पानांवरून वाद; सावरकर कुटुंबीय आक्रमक, पाठवली कायदेशीर नोटीस

Sonia Gandhi Book Savarkar Controversy: सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुस्तकातील पान क्रमांक २०१ आणि ४४३ वरील विधानांवर आक्षेप घेत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Rahul Shelke

Sonia Gandhi Book Savarkar Controversy: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या दोन विधानांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी या विधानांवर आक्षेप घेत सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुस्तकातील संबंधित विधानांबद्दल माफी मागावी आणि त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.

सात्यकी सावरकर यांनी आपले वकील संग्राम कोल्हटकर यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे. पुस्तकाच्या पान क्रमांक २०१ आणि ४४३ वर सावरकर यांच्याबद्दल करण्यात आलेली विधाने तथ्यांशी विसंगत आणि इतिहासाचा चुकीचा अर्थ लावणारी असल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. या विधानांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा आणि त्यांच्या ऐतिहासिक वारशाला धक्का पोहोचत असल्याचेही सात्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.

पुस्तकाच्या पान क्रमांक २०१ वरील विधानावर आक्षेप

सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ वरील विधानावर सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला आहे. या पानावर सावरकर यांचा उल्लेख ब्रिटिश सत्तेशी सहकार्य केलं, असा करण्यात आला आहे.

या विधानामुळे सावरकर ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देत होते किंवा त्यांना मदत करत होते, असा अर्थ निघत असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. सात्यकी सावरकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

सावरकर यांची तुरुंगवासाची शिक्षा, त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केलेले अर्ज आणि त्यांची राजकीय भूमिका या सर्व गोष्टी तत्कालीन ऐतिहासिक परिस्थितीच्या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. मात्र, पुस्तकातील विधानांमध्ये या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करण्यात आलेला नाही, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

पान क्रमांक ४४३ वरील विधानावरही नाराजी

पुस्तकाच्या पान क्रमांक ४४३ वरील विधानावरही सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला आहे. या पानावर सावरकर यांच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेचा उल्लेख करताना हिंदूच सर्वोच्च आहेत अशी मांडणी करण्यात आल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे.

सावरकर यांचे राजकीय विचार आणि तत्त्वज्ञान केवळ धार्मिक वर्चस्वाच्या भूमिकेतून समजून घेणे चुकीचे असल्याचे सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे. सावरकर यांचे लेखन, भाषणे आणि राजकीय विचार यांचा अभ्यास करताना त्यावेळची ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

माफी आणि स्पष्टीकरण देण्याची मागणी

सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटिशीत या विधानांमुळे सावरकर कुटुंबीयांना दुःख झाल्याचे नमूद केले आहे. पुस्तकातील संबंधित मजकुराबाबत सोनिया गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता या कायदेशीर नोटिशीवर सोनिया गांधी यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT