Vijay TVK Tamil Nadu election results
चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने १०८ जागा जिंकून राज्यातील डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) या दोन प्रमुख द्रविड पक्षांना मोठा धक्का दिला आहे. विजय यांनी आज (दि. ६) तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यासह गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेतील नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे.
टीव्हीके हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, आता त्यांना काँग्रेस आणि इतर काही छोट्या राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याच्या जोरावर विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
वृत्तसंस्था 'पीटीआय'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू काँग्रेसने राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या (PAC) तातडीच्या बैठकीत विजय यांच्या TVK ला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.तमिळनाडूचे काँग्रेस प्रभारी गिरीश चोडणकर यांनी ही बैठक बोलावली होती. 'झूम' कॉलद्वारे झालेल्या या बैठकीत बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी विजय यांना पाठिंबा देण्याचे मत व्यक्त केले. सूत्रांनी सांगितले की, "तमिळनाडूमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीके नेते विजय यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे."
यापूर्वी काँग्रेसने स्पष्ट केले होते की, विजय यांनी पाठिंब्यासाठी संपर्क साधला असून, हायकमांडने स्थानिक भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसने ही निवडणूक डीएमके (DMK) सोबत युती करून लढवली होती. "भाजप किंवा त्यांच्या प्रतिनिधींना कोणत्याही प्रकारे तमिळनाडूच्या सत्तेत स्थान मिळू नये," अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.