ज्योतिषी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात 'विशेष कार्य अधिकारी' (राजकीय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Pudhari
राष्ट्रीय

TN Politics : मुख्यमंत्रीपदाचे भाकित खरे ठरले, ज्योतिष्याचेच नशीब फळफळले! CM विजय यांच्या कार्यालयात मिळाले मोठं पद!

महत्त्वाच्या निर्णयांवरील प्रभावामुळे राधन पंडित वेट्रिवेल यांनी वेधले सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu CM OSD appointment

चेन्‍नई : तमिळनाडूमध्ये 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी करणारे विजय यांचे वैयक्तिक ज्योतिषी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात 'विशेष कार्य अधिकारी' (राजकीय) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांशी असलेले त्यांचे जवळचे संबंध आणि महत्त्वाच्या निर्णयांवरील त्यांचा प्रभाव यामुळे या नियुक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विजयासाठी 'शुभ मुहूर्त' आणि ज्योतिष्याचा सल्ला

तमिळनाडूच्या राज्यपालांनी वारंवार नकार दिल्यानंतर अखेर विजय यांचा सरकार स्थापनेचा दावा स्वीकारण्यात आला. सुरुवातीला विजय यांचा शपथविधी १० मे रोजी दुपारी ३:४५ वाजता होणार होता. मात्र, त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी आणि TVK चे प्रवक्ते रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांनी 'शुभ मुहूर्त' असल्याचे सांगितल्यामुळे हा सोहळा सकाळी १० वाजता उरकून घेण्यात आला. विजय यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात वेट्रिवेल यांनी पावलोपावली त्यांना मार्गदर्शन केल्याची चर्चा तामिळनाडूच्‍या राजकीय वर्तुळात आहे. आता विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर वेट्रिवेल यांचेही नशीब फळफळले आहे. मंगळवारी तमिळनाडू सरकारने अधिकृत आदेश काढून त्यांची मुख्यमंत्र्यांचे 'विशेष कार्य अधिकारी' (OSD - Political) म्हणून नियुक्ती केली.

दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शक

तमिळनाडूतील एक प्रख्यात ज्‍योतिष मार्गदर्शक म्हणून वेट्रिवेल यांची ओळख आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वीच विजय यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. केवळ विजयच नव्हे, तर दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह अनेक दिग्गज राजकारणी वेट्रिवेल यांच्या सल्ल्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावत असत. TVK पक्षाचा विजय झाल्यानंतर विजय यांचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचलेल्या पहिल्या काही व्यक्तींमध्ये वेट्रिवेल यांचा समावेश होता.

४० वर्षांचा अनुभव आणि राजकीय एन्ट्री

गेल्या चार दशकांपासून ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेट्रिवेल यांनी अनेक बड्या नेत्यांचे भविष्य वर्तवले आहे. मात्र, त्यांनी स्वतःच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वर्तवले होते का, हे अद्याप अस्पष्ट आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, माजी मुख्यमंत्री जयललिता अनेकदा वेट्रिवेल यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच महत्त्वाचे निर्णय घेत असत. याशिवाय ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांना ज्योतिषीय सल्ला देतात.

पहिल्‍याच निवडणुकीत टीव्‍हीकेच्‍या जिंकल्‍या १०८ जागा

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने २३४ पैकी १०८ जागा जिंकून दमदार कामगिरी केली. विजय यांना स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरी काँग्रेस आणि VCK सारख्या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT