Vice President Election :
उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली असताना भारतातील दोन महत्वाच्या पक्षांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारतीय राष्ट्र समिती अर्थात बीआरएस आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वात तयार झालेली बीजू जनता दल अर्थात बीजेडी यांनी आदल्या दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळं आता ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निडवणुकीवर त्याचा काय परिणाम होतो हे पहावं लागेल.
बीजेडी आणि बीआरएस या दोन पक्षांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी युती आणि विरोधातील इंडिया आघाडी या दोन्हींच्या उमेदवारांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानच न करण्याचा निर्णय घेतला. जरी या दोन पक्षांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फारसा परिणाम निकालावर होण्याची शक्यता नाही.
या दोन्ही पक्षांनी सांगितलं की आम्ही इंडिया ब्लॉक किंवा एनडीए या दोन्हीपासून समान अंतर ठेवणार आहोत. आम्ही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभाग घेणार नाही. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामा राव यांनी सोमवारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी तेलंगणा राज्यात युरियाच्या तुटवडा झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी हा गंभीर मुद्दा आहे. याच्या निषेधार्थ आम्ही उपराष्ट्रपती पदाच्या मतदान प्रक्रियेतच सहभागी होणार नाहीये. हा प्रश्न भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सोडवण्यात अपयश आल्याचा आरोप बीआरएसनं केली. बीआरएसनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय उपलब्ध असेल तर तो आम्ही निवडणार असं सांगितलं.
दुसरीकडं बीजू जनता दलाचे नेता सस्मित पात्रा यांनी त्यांच्या पक्षाची प्राथमिकता ही ओडिसा राज्य आहे. या राज्यात साडेचार कोटी लोकं राहतात. पात्रा म्हणाले, 'आमच्या पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी वरिष्ठ नेत्यांशी आणि राजकीय विषयक समिती, खासदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला. बीजद इंडिया ब्लॉक आणि एनडीए या दोन्हीपासून समान अंतर राखून राहील असं सांगण्यात आलं.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येईल. इंडिया आघाडीकडून सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे रिंगणात आहेत. तर एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी मिळाली आहे.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही एका निवडणूक मंडळाद्वारे होते. यात संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रतिनिधी सहभाग घेतात. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संविधानाच्या कलम ६४ आणि ६८ नुसार संचालित केली जाते. २१ जुलै रोजी मान्सून सत्राच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी तब्येतीचं कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच आहे.