Vehicle Insurance Rules Proposal  AI-generated image
राष्ट्रीय

Vehicle Insurance Rules Proposal: कार-दुचाकी विम्याचे नियम बदलणार? प्रीमियम वाढीसह 'विमा नाही तर इंधन नाही'वरही विचार

जास्तीत जास्त वाहने वैध विम्याच्या कक्षेत आणण्‍याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मुख्य उद्देश आहे.

पुढारी वृत्तसेवा

Vehicle Insurance Rules Proposal : देशातील वाहन विम्याच्या नियमांत मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कार आणि दुचाकी मालकांना लवकरच त्यांच्या वाहनांचा विमा खरेदी करण्याच्या किंवा नूतनीकरण करण्याच्या पद्धतीवर पुनर्विचार करावा लागू शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी विमा महाग ठेवणे, हनांचा विमा उतरवलेला नाही, अशा वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन न मिळणे, अशा बदलांचाही सरकार विचार करत असल्‍याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. जास्तीत जास्त वाहने वैध विम्याच्या कक्षेत आणणे, हा यामागचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मुख्य उद्देश आहे.

वाहतूक नियम मोडल्यास विमा महागणार?

सरकारच्‍या नवीन प्रस्तावानुसार, वाहन मालकांच्या विमा हप्ता (प्रीमियम)ची रक्कम त्यांच्या मागील वर्षातील वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या नोंदीशी जोडली जाऊ शकते. एखाद्या चालकाने वारंवार वाहतूक नियम मोडल्यास, पॉलिसीचे नूतनीकरण करताना त्याला अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो. दुसरीकडे, नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांना याचा कमी फटका बसेल. मात्र, कोणत्या प्रकारच्या उल्लंघनासाठी किती अतिरिक्त प्रीमियम आकारायचा, हे अद्याप निश्चित झालेले नाही. ही यंत्रणा कशी राबवायची, यावर मंत्रालय काम करत आहे.

६ वर्षांपर्यंतच्या पॉलिसीचा पर्याय

दीर्घ मुदतीच्या विमा पॉलिसी सुरू करण्याचाही सरकारचा विचार आहे. यानुसार, कार मालकांना एकरकमी प्रीमियम भरून ४ वर्षांची विमा पॉलिसी घेता येईल, तर दुचाकींसाठी ६ वर्षांच्या पॉलिसीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. यामुळे वाहनधारकांना दरवर्षी विमा नूतनीकरणाची ताप वाचणार आहे. तसेच सातत्यपूर्ण विमा संरक्षण टिकवणे सोपे होईल. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहनांसह काही ठराविक श्रेणीतील वाहनांच्या मूळ प्रीमियममध्येही बदलाचा विचार सुरू आहे.

'विमा नाही तर इंधन नाही' प्रस्‍तावाचाही महत्त्वाचा मुद्दा

'विमा नाही तर इंधन नाही' (No Insurance, No Fuel) हा या प्रस्तावातील महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने रस्ते वाहतूक आणि पेट्रोलियम मंत्रालयाला या उपक्रमाचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यास सांगितले आहे. सुरुवातीची चाचणी हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्‍यांमध्ये होऊ शकते; त्यासाठी दोन्ही राज्यांतील प्रत्येकी ५ पेट्रोल पंपांची निवड केली जाईल. या पंपांवर 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन' कॅमेरे बसवले जातील. कॅमेऱ्यांद्वारे नोंदणी क्रमांक वाचून संबंधित वाहनाचा विमा वैध आहे की नाही, याची पडताळणी करणे शक्य होईल. सध्या हा केवळ प्रस्तावित प्रायोगिक प्रकल्प असून, तो देशभरात लागू करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

देशात किती वाहनांकडे वैध विमा?

रिपोर्टनुसार, देशात सुमारे २५ कोटी सक्रिय वाहनांकडे वैध विमा असून, हे प्रमाण एकूण कार्यरत वाहनांच्या सुमारे ८१ टक्के आहे. विविध वाहन प्रकारांत विमा कव्हरेजचे प्रमाण वेगवेगळे आहे. ९० टक्क्यांहून अधिक अवजड व्यावसायिक वाहने आणि सुमारे ८८ टक्के कार्सचा वैध विमा आहे. दुचाकींचे हे प्रमाण जवळपास ८० टक्के आहे. या तुलनेत रिक्षांसारख्या (थ्री-व्हीलर) वाहनांचे प्रमाण सर्वात कमी असून, केवळ ५७ टक्के वाहनांकडेच वैध विमा पॉलिसी आहे. विमा कव्हरेजची ही आकडेवारी लक्षात घेऊनच सरकार नव्या नियमांची चाचपणी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT