Varanasi Scorpio Truck Accident: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रील बनवण्याच्या नादात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रूपापूर परिसरातील महामार्गावरील ओव्हरब्रिजजवळ सोमवारी सकाळी भरधाव ट्रकने स्कॉर्पिओ गाडीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. धडकेनंतर दोन तरुण पुलावरून खाली रस्त्यावर पडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपूर परिसरातील आठ तरुण मिर्झापूर येथील माँ विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते स्कॉर्पिओ गाडीतून परतत होते. सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी रूपापूर येथील ओव्हरब्रिजजवळ आली. यावेळी तरुणांनी गाडी थांबवली होती. ते रील बनवत होते अशी माहिती मिळाली आहे.
तरुण रील बनवत असतानाच प्रयागराजच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या स्कॉर्पिओला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे गाडीच्या आसपास उभे असलेले तरुण गंभीर जखमी झाले. यातील दोन तरुण पुलावरून खाली रस्त्यावर पडले. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या चार तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका जखमीला कछवां रोड परिसरातील रुग्णालयात, तर अन्य तिघांना उपचारासाठी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) रुग्णालयात पाठवण्यात आले.
अपघातानंतर ट्रकचालक वाहन घटनास्थळी सोडून पळून गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच मृत आणि जखमी तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महामार्गावर वाहन थांबवून रील बनवणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.