राष्ट्रीय

Vande Mataram discussion : पंतप्रधान मोदींनी जातीयवाद्यांना दोष देणारी नेहरूंची ओळ का वगळली ? : प्रियांका गांधींचा सवाल

मोदी जेवढा काळ पंतप्रधान आहेत तितकी वर्ष नेहरूंनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तुरुंगात व्‍यतित केली

पुढारी वृत्तसेवा

Vande Mataram Lok Sabha Discussion

नवी दिल्‍ली : वंदे मातरमच्या उर्वरित कडव्यांवर तथाकथित आक्षेप जातीयवाद्यांनी तयार केला होता. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात या भागाचा उल्लेख केला नाही, असे स्‍पष्‍ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरमसंदर्भात पंडित जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेस पक्षासंदर्भात केलेले दावे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी फेटाळून लावले. वंदे मातरम ही केवळ एक भावना नाही तर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील शक्ती आणि नैतिकतेचे प्रतीक आहे, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले. वंदे मातरम राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्‍यानिमित्त आयोजित विशेष चर्चेत त्‍या लोकसभेत बोलत होत्‍या.

मोदी जेवढा काळ पंतप्रधान आहेत तितकी वर्ष नेहरूंनी तुरुंगात व्‍यतित केली

प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल केला. त्‍या म्‍हणाल्‍या, संविधान सभेने मंजूर केलेल्या वंदे मातरमच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, मौलाना आझाद आणि भीमराव आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांचा अपमान असल्याचे त्या म्हणाल्या. प्रियांका म्हणाल्या की, पंतप्रधान १२ वर्षे देश चालवत आहेत, जो काळ स्वातंत्र्यलढ्यात पंडित नेहरूंनी तुरुंगात घालवला होता.

प्रियांका गांधी यांनी फेटाळले सर्व दावे

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1937 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत प्रियांका गांधी म्हणाल्या, "वंदे मातरमच्या उर्वरित कडव्यांवर तथाकथित आक्षेप जातीयवाद्यांनी तयार केला होता. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात या भागाचा उल्लेख केला नाही.

पंतप्रधान चांगले वक्ते, परंतु तथ्य कमकुवत

प्रियंका गांधी यांनी लोकसभेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्रभावी होते, परंतु त्यात तथ्यांचा अभाव होता. तिने म्हटले की, पंतप्रधानांनी वंदे मातरमचा इतिहास सांगताना काही तथ्ये वगळली. १८९६ मध्ये काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गाणे गायले होते, असे प्रियांका यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी स्पष्ट केले की वंदे मातरम् हे मूळतः बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दोन श्लोकांसह रचले होते आणि १८८२ मध्ये आनंदमठ या कादंबरीत त्यात आणखी चार श्लोक जोडले गेले होते. प्रियांका म्हणाल्या की त्यांना सभागृहात तथ्ये म्हणून मांडायची आहेत.

वंदे मातरमवर चर्चा करण्याची गरज का होती?

संसदेत वंदे मातरमवर चर्चा घेण्‍याची गरज काय होती, असा सवाल करत हे गीत १५० वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आहे आणि स्वतंत्र भारतात ७५ वर्षांपासून लोकांच्या हृदयात आहे. प्रियंका यांनी विचारले की आज यावर चर्चा करून सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ताधारी पक्षाने लोकांच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे आणि अशा मुद्द्यांवर वाद निर्माण करू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

काय म्‍हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?

१९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली. परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली. ते मुस्लिम लीगसमोर शरण गेले. नेहरूंनी दावा केला की, वंदे मातरम मुस्लिमांच्‍या भावना भडकावू शकते. आपल्या पुढच्या पिढ्यांना हे कोणी केले हे सांगणे आपले कर्तव्य आहे, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंवर हल्लाबोल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT