Vande Bharat Food Controversy: देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान मानली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी कारण आहे ट्रेनमधील जेवण. रांची येथील एका महिलेने दावा केला की ट्रेनमध्ये दिलेल्या जेवणामुळे तिला अॅलर्जी झाली. या घटनेनंतर सोशल मीडियावर फोटो आणि मेडिकल रिपोर्ट व्हायरल होताच प्रकरण तापलं आहे.
रांचीतील आयुषी सिंह यांनी 27 मार्च रोजी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22500) मध्ये E1 कोचमध्ये प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी ट्रेनमध्ये दिलेलं जेवण घेतलं.
त्यांच्या म्हणण्यानुसार, जेवण केल्यानंतर काही वेळातच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना अॅलर्जी झाली आणि त्यांचे ओठ मोठ्या प्रमाणात सूजले. एवढंच नाही, तर त्यांच्या दोन वर्षांच्या मुलालाही जुलाबाचा त्रास सुरू झाला.
आयुषी यांनी या घटनेचे फोटो आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये त्यांचे ओठ सूजलेले दिसत आहेत. त्यांनी दावा केला की ही, अॅलर्जी गंभीर होती आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास परिस्थिती आणखी बिघडली असती. त्यांनी जेवणाच्या गुणवत्तेबरोबरच ट्रेनमधील पाण्यावरही शंका व्यक्त केली आहे.
या प्रकरणावर Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने स्पष्टीकरण दिलं आहे. IRCTC च्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी दिलेल्या जेवणाची तपासणी करण्यात आली होती आणि सर्व काही समाधानकारक होतं.
तसेच, इतर कोणत्याही प्रवाशाकडून तक्रार आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. तरीही, आयुषी यांनी IRCTC च्या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केलं नाही. त्यानंतर IRCTC ने त्यांच्याकडून अधिक माहिती मागवून तपास करण्याचं आश्वासन दिलं आहे.
वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये अशी घटना घडल्याचा आरोप होणं ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आणि सत्य समोर येणं गरजेचं आहे, कारण यात फक्त एका प्रवाशाचा प्रश्न नसून लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आहे.