Crime News
वडोदरा: प्रेमसंबंधाला होणारा विरोध आणि घरातील खोलीत कोंडून ठेवल्याच्या रागातून एका १७ वर्षीय मुलीने आपल्याच वडिलांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील वडोदरा येथे उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून केल्याने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. (Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलीने १६ डिसेंबरपासून सलग तीन दिवस आपल्या आई-वडिलांना गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न केला. अखेर १८ डिसेंबरच्या रात्री तिला यात यश आले. औषधामुळे आई-वडील गाढ झोपेत असताना तिने आपल्या प्रियकराला बोलावून घेतले. तिचे वडील शाना चावडा झोपलेले असताना प्रियकराने त्यांच्यावर सपासप वार केले. ज्या खोलीत मुलीला कोंडले होते, त्या खोलीच्या खिडकीतून ती आपल्या वडिलांची हत्या होताना पाहत होती.
या प्रकरणातील संशयीत आरोपी मुलीचा प्रियकर रणजित वाघेला (वय २५) हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. तिचे वडील शाना चावडा यांनीच त्याच्याविरूद्ध पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी सकाळी शाना यांचा मृतदेह आढळल्यानंतर, त्यांच्या भावाने वाघेलावर संशय व्यक्त केला होता. जुलै महिन्यात ही मुलगी वाघेलासोबत पळून गेली होती, त्यानंतर वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती.
वडोदरा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की, वडिल मुलीला आणि पत्नीला रात्री खोलीत कोंडून बाहेर झोपत होते. मोठ्या मुलीनेही तिच्या मर्जीने लग्न केल्यामुळे शाना यांचा धाकट्या मुलीच्या प्रेमसंबंधाला तीव्र विरोध होता.
पहिला प्रयत्न : १६ डिसेंबरला मुलीने पाण्यात गुंगीच्या गोळ्या टाकल्या, पण आईला पाण्याची चव वेगळी वाटल्याने त्यांनी ते पाणी प्यायले नाही. त्यानंतर मंगळवारी रात्री जेवणात गोळ्या मिसळल्या. आई-वडील झोपले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मुलीने आवाज केला, तेव्हा आई जागी झाल्यामुळे त्या रात्रीचा दुसरा बेत फसला. तिचा १८ डिसेंबरचा तिसरा प्रयत्न मात्र यशस्वी झाला. रात्री पुन्हा जेवणात औषध मिसळले. आई-वडील बेशुद्ध होताच तिने प्रियकर वाघेला याला बोलावले. वाघेला त्याचा मित्र भव्य वसावा (वय २३) याला घेऊन आला आणि त्यांनी शाना यांची हत्या केली. पोलिसांनी रणजित वाघेला आणि भव्य वसावा या दोघांना अटक केली आहे. (Crime News)