Uttarkashi Cloudburst  file photo
राष्ट्रीय

Uttarkashi Cloudburst : उत्तरकाशीमध्ये पावसाचा हाहाकार, यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

उत्तरकाशी जिल्ह्यात यमुनोत्री महामार्गावर सिलाई बँडजवळ ढगफुटी झाली असून अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत.

मोहन कारंडे

Uttarkashi Cloudburst

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणारे ८-९ कामगार बेपत्ता झाले. यमुनोत्री मार्गावरही परिणाम झाला आहे. बेपत्ता मजुरांच्या शोधासाठी प्रशासनाचे पथक आणि एसडीआरएफकडून (SDRF) बचावकार्य सुरू असल्याचे उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य यांनी सांगितले.

ही घटना रात्री उशिरा १२ वाजण्याच्या सुमारास घडली. बडकोटचे ठाणेदार दीपक कठेत यांनी सांगितले की, यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली होती. पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर पाहिले की, येथे रस्त्याच्या आणि इतर कामांमध्ये गुंतलेले काही लोक तंबू टाकून राहत होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले आहेत. आतापर्यंत आठ ते नऊ जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. हे सर्व नेपाळी वंशाचे आहेत. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितले की, पथकाने बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला आहे.

यमुनोत्री महामार्ग अनेक ठिकाणी बंद

ढगफुटीनंतर यमुनोत्री महामार्ग सिलाई बँडसह अनेक ठिकाणी बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग (NH) विभागाचे पथक रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न करत आहे. तर, ओझरीजवळचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. शेतांमध्ये ढिगारा साचला आहे. स्यानाचट्टी येथील कुपडा कुंशाला त्रिखिली मोटर पूलही धोक्यात आला आहे. यमुना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

ढिगारा आल्याने यमुना नदीचा प्रवाह थांबला, तलाव निर्माण झाला

यमुनोत्री महामार्गावरील स्याना चट्टीजवळ कुपडा कुनसाला मोटर मार्गावरील पुलाजवळ वरून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आल्याने यमुना नदीचा प्रवाह थांबला आणि येथे तलाव तयार होऊ लागला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि यमुना नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक रहिवासी जयपाल सिंह रावत यांनी सांगितले की, येथील हॉटेलच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे.

डेहरादूनसह सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. आज (रविवार) पासून पुढील तीन दिवस राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विज्ञान केंद्राचे संचालक बिक्रम सिंह यांनी सांगितले की, २९ जून ते १ जुलैपर्यंत देहरादूनसह टिहरी, पौडी, चंपावत, हरिद्वार, नैनिताल आणि उधमसिंह नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT