Uttarakhand Landslide
मुंबई : उत्तराखंडमधील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील १७२ पैकी १७१ पर्यटक सुरक्षित आहेत. उर्वरीत एक पर्यटक कृतिका जैन यांच्याशी उत्तराखंडमधील स्थानिक प्रशासन संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत आहे.
एकुण १७१ पर्यटकांपैकी १६० पर्यटक (३१ मातली, ६ जॉली ग्रॅन्ट तसेच १२३ उत्तरकाशी) येथे सुखरुप आहेत. सुरक्षित पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार वाटचाल सुरु केली आहे. उर्वरित ११ पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असून त्यांना एअर लिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष हे उत्तराखंड जिल्हा नियंत्रण कक्ष, उत्तरकाशी आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे स्वतः उत्तरकाशी येथे घटनास्थळी दाखल झाले आहेत. राज्यातील पर्यटकांच्या शोध आणि बचावकार्यासाठी ते दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूपस्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
उत्तराखंडमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांकडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेल्या अहवालानुसार, हर्षील येथे थांबलेल्या उर्वरित पर्यटकांना रविवारी सकाळी ६ वाजता हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्याचे कार्य सुरू केले आहे.
लष्करासह इतर यंत्रणेची बचावपथके धराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा अंशतः चालू झाल्या असून रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत, अशी माहीती महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी दिली आहे.