UPSC Prelims Result 2025
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. २५ मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती.
या परीक्षेला सुमारे १० लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी काही हजारच उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांच्या रोल नंबरसह गुणवत्ता यादी पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो तरुणांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय वन सेवेत (IFS) संधी मिळवण्यासाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची पूर्व परीक्षा दिली होती. या निकालामुळे आता १४,१६१ उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करतानाच, आयोगाने अखिल भारतीय स्तरावरील गुणानुक्रम (AIR) अर्थात टॉपर्सची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांनी प्रवर्गनिहाय कट-ऑफ गुण प्राप्त केले आहेत, तेच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
पूर्व परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांसाठी आता पुढील आव्हान मुख्य परीक्षेचे असणार आहे. ही मुख्य परीक्षा २८ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित केली जाईल. यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये एकूण ९ पेपर असतात, ज्यामध्ये प्रत्येक पेपर २५० गुणांचा असतो. याव्यतिरिक्त, भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेचे प्रत्येकी ३०० गुणांचे दोन अनिवार्य पेपरही असतात. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाते.
लोकसेवा आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नागरी सेवा परीक्षेअंतर्गत आयएएससाठी एकूण ९७९ पदे आणि भारतीय वन सेवेसाठी (आयएफएस) एकूण १५० पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
१. सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला upsc.gov.in भेट द्या.
२. संकेतस्थळाच्या होम पेजवरील 'व्हॉट्स न्यू' (What's New) विभागात निकालाशी संबंधित पीडीएफ लिंकवर क्लिक करा. ३. क्लिक केल्यानंतर, निकालाची पीडीएफ फाईल स्क्रीनवर उघडेल.
४. या पीडीएफ फाईलमध्ये उमेदवार आपला रोल नंबर शोधून निकाल पाहू शकतात. ही फाईल डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना आता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निकालामुळे अनेक होतकरू तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या असून, देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली आहे.