UPSC IES/ISS Final Result 2025 :
युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात UPSC अंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आणि इंडियन स्टॅटस्टिक्स सर्व्हिसेसच्या परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. देशात Indian Economic Service मध्ये मोहित अग्रवाल नदबईवाला हा पहिला आला आहे. तर ऊर्जा रहेजा दुसऱ्या आणि गौतम मिश्रानं तिसऱ्या स्थान पटकावलं आहे. दुसरीकडं Indian Statistical Service चे निकाल पाहिले तर कशिस कसाना देशात पहिला आला आहे. त्यानंतर, आकाश शर्मा दुसऱ्या स्थानावर असून शुभेंदू घोष तिसरे स्थान पटकालं आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय आर्थिक सेवा (IES) / भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. या परीक्षेचा लेखी टप्पा २० जून ते २२ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता, तर मुलाखती सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आल्या होत्या. आयोगाने निकाल जाहीर केल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जातील, अशी माहितीही दिली आहे.
या निकालामध्ये एकूण १२ उमेदवारांचे निकाल तात्पुरते (Tentative) ठेवण्यात आले आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेदवारांचे निकाल तात्पुरते ठेवण्यात आले आहेत, त्यांच्याकडून आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे तपासली जाऊन त्यांच्या 'तात्पुरत्या' स्थितीबद्दल स्पष्टता मिळेपर्यंत, आयोगाकडून त्यांना नोकरीची ऑफर (Offer of Employment) दिली जाणार नाही. सर्व पात्र उमेदवारांनी पुढील प्रक्रिया आणि सूचनांसाठी आयोगाच्या वेबसाइटला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.