पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यावरून संसदेत गदारोळ झाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.  ANI Photo
राष्ट्रीय

विनेश फोगाट अपात्र ठरल्याप्रकरणी संसदेत गदारोळ; विरोधकांचा सभात्याग

क्रीडा मंत्र्यांनी लोकसभेत दिले उत्तर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यावरून आज (दि.७) संसदेत प्रचंड गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात हा मुद्दा उपस्थित झाला. यावर विरोधकांनी सरकारकडे उत्तरे मागितले. सरकारच्या वतीने क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनीही लोकसभेत यावर उत्तर दिले. मात्र, त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. या उत्तरानंतर विरोधकांना प्रश्न विचारायचे होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला परवानगी दिली नाही. त्यांनी नियमांचा हवाला देत विरोधकांची मागणी फेटाळून लावली. यानंतर विरोधकांनी सभागृहातून सभात्याग करून निषेध व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांची पी. टी. उषा यांच्याशी चर्चा

मनसुख मांडविया यांनी विनेश फोगाट यांच्या अपात्रतेची कारणे आणि त्यानंतर सरकारने उचललेली पावले याबद्दल सभागृहाला माहिती दिली. क्रीडा मंत्र्यांनी सांगितले की, सकाळी दोनदा विनेशचे वजन तपासण्यात आले. वजन ५० किलो १०० ग्रॅम असल्याचे आढळून आले. त्यानंतर विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. या प्रकरणाचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पी. टी. उषा यांच्याशी चर्चा केली आहे.

विनेश फोगाटला शक्य ती सर्व मदत

विनेश फोगाटला सरकारने कोणत्या प्रकारची मदत केली, हेही क्रीडा मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. भारत सरकारने त्यांच्या गरजेनुसार शक्य ती सर्व मदत केली. त्यांच्यासाठी वैयक्तिक कर्मचारीही नेमण्यात आले होते. क्रीडा मंत्र्यांनी सांगितले की, प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील यांना नेमण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT