Crime News
उत्तर प्रदेश : एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून बॅगेत भरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेला ही हत्या एका लहान चुकीमुळे उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर गौरव याला अटक केली आहे.
१५ डिसेंबर रोजी पोलिसांनी पतरौआ नावाच्या रस्त्यावर एका काळ्या रंगाच्या बॅगेत कुजलेल्या अवस्थेत मानवी धड जप्त केले होते. या मृतदेहाचे डोके आणि हात-पाय गायब असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
फॉरेन्सिक तपासणी दरम्यान, पोलिसांना त्या धडाच्या हातावर राहुल असे नाव गोंदलेले आढळले. ही तपासातील पहिली मोठी यशाची पायरी ठरली. यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या असता, २४ नोव्हेंबर रोजी चुन्नी मोहल्ला येथील रुबी नावाच्या महिलेने तिचा पती राहुल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले. पोलिसांनी रुबीला ओळख पटवण्यासाठी बोलावले, मात्र मृतदेहासोबत सापडलेले कपडे पाहून तिने तो मृतदेह तिच्या पतीचा नसल्याचे सांगितले. मात्र, तिच्या बोलण्यातील विसंगती आणि वागण्यातील भीतीमुळे पोलिसांचा संशय बळावला.
जेव्हा पोलिसांनी रुबीचा मोबाईल तपासला तेव्हा तिच्या गॅलरीमध्ये एका पुरुषासोबतचा फोटो सापडला, ज्यामध्ये त्या व्यक्तीने तोच टी-शर्ट घातला होता जो बॅगेत सापडलेल्या मृतदेहावर होता. या पुराव्यासमोर रुबी टिकू शकली नाही आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली.
रुबीने सांगितले की, तिचे गौरवासोबत प्रेमसंबंध होते. १७-१८ नोव्हेंबरच्या रात्री तिने गौरवला घरी बोलावले होते. रात्री २ च्या सुमारास तिचा पती राहुल अचानक घरी आला आणि त्याने दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यांच्यात वाद झाला आणि रुबीने राहुलच्या डोक्यात एका जड वस्तूने घाव घातला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी रुबी आणि गौरवने राहुलच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. गौरवने एक कटर मशीन आणले आणि त्यांनी राहुलचे डोके, हात आणि पाय कापले. रुबीने बाजारातून दोन मोठ्या काळ्या बॅगा विकत घेतल्या. त्यांनी डोके आणि हात-पाय एका बॅगेत भरून चंदौसीपासून ५० किमी अंतरावर राजघाट येथील गंगा नदीत फेकून दिले, तर धड दुसऱ्या बॅगेत भरून इदगाहाच्या मागे फेकले.
संशय येऊ नये म्हणून रुबीने स्वतःच २४ नोव्हेंबर रोजी पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र, हातावरचे नाव आणि टी-शर्टच्या पुराव्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून उर्वरित अवयवांचा शोध सुरू आहे.