Crime News
फत्तेपूर: उत्तर प्रदेशातील फत्तेपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय पुरुषाने आपल्यापेक्षा २४ वर्षांनी लहान असलेल्या १८ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून अपघाताचा बनाव रचला होता. औरेई गावात ही घटना घडली असून, पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा देवी (वय १८) असे मृत तरुणीचे नाव आहे. औरेई गावातील रहिवासी असलेला गंगासागर (वय ४२) याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर तो गावातच राहणाऱ्या पुष्पाच्या संपर्कात आला. गंगासागरने पुष्पाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर दोघेही नोव्हेंबर महिन्यापासून राधानगर भागात भाड्याच्या खोलीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांनी कोर्ट मॅरेजही केले होते.
पुष्पाचा तिच्या घरच्यांशी संपर्क तुटल्याने कुटुंबीयांना तिच्यासोबत काहीतरी अनर्थ घडल्याची शंका आली. तिचे वडील महावीर लोधी यांनी राधानगर पोलीस ठाण्यात जाऊन गंगासागरविरुद्ध तक्रार दाखल केली. मुलगी बऱ्याच दिवसांपासून संपर्कात नसून गंगासागरनेच तिची हत्या करून मृतदेह लपवल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून गंगासागरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हत्येनंतर तीन दिवस त्याने मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. त्यानंतर मुलगा आणि अन्य तीन सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह ट्रॅक्टरवरून नेऊन रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला, जेणेकरून हा अपघात वाटेल.
२९ जून रोजी पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. ओळख पटू न शकल्याने पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले होते. मात्र, गावात हत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली.
पोलीस अधीक्षक अभिमन्यू मांगलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुख्य आरोपी गंगासागरसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या कटात सहभागी असलेला आणखी एक आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.