Dussehra Cockroach Effigy Pudhari
राष्ट्रीय

Dussehra Cockroach Effigy: दसऱ्याला रावणासोबत झुरळाचंही दहन! रामलीला समितीचा अनोखा निर्णय, नेमकं कारण काय?

Delhi Dussehra Cockroach Effigy: दिल्लीतील पीतमपुरा येथे दसऱ्याला रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्यासोबत ३० फुटांच्या झुरळाच्या पुतळ्याचेही दहन केले जाणार आहे.

Rahul Shelke

Delhi Dussehra Cockroach Effigy: दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. मात्र, यंदा दिल्लीतील दसरा उत्सवात आणखी एका पुतळ्याची भर पडणार आहे. दिल्लीतील पीतमपुरा येथील नेताजी सुभाष प्लेस मैदानावर रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्यासोबत तब्बल ३० फुटांच्या झुरळाच्या पुतळ्याचेही दहन केले जाणार आहे. श्री केशव रामलीला समितीने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची सध्या चर्चा सुरू असून, त्याला राजकीय संदर्भही जोडले जात आहेत. मात्र, समितीच्या मते, झुरळाचा पुतळा हा घरातील, परिसरातील आणि समाजातील अस्वच्छतेचे प्रतीक आहे. स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

अस्वच्छतेविरोधात जनजागृती करण्याचा उद्देश

श्री केशव रामलीला समितीचे अध्यक्ष आणि मॉडेल टाउनचे आमदार अशोक गोयल देवराहा यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दसरा हा केवळ रावण दहनाचा सण नाही, तर समाजातील वाईट गोष्टी दूर करण्याचा संदेश देणारा उत्सव आहे.

घरांमध्ये, आजूबाजूच्या परिसरात आणि संपूर्ण समाजात स्वच्छता राखण्याची गरज आहे. झुरळ हे अस्वच्छतेचे प्रतीक मानून त्याचा पुतळा जाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा समितीचा प्रयत्न आहे.

'अधर्मावर धर्माचा विजय' हा दसऱ्याचा संदेश

दसऱ्याच्या महत्त्वाबद्दल बोलताना अशोक गोयल देवराहा म्हणाले की, देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय हे या सणाचे मुख्य प्रतीक आहे.

गेल्या हजारो वर्षांपासून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. यातून अखेर सत्याचाच विजय होतो, असा संदेश दिला जातो. याच विचारातून समाजाला त्रास देणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समिती वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधीही सामाजिक समस्यांवर वेधले होते लक्ष

रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्यासोबत झुरळाचा पुतळा जाळण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेतलेला नाही. समिती गेल्या काही वर्षांपासून देशासमोरील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहे.

यापूर्वी नक्षलवाद आणि दहशतवाद यांसारख्या समस्यांचे प्रतीक म्हणून पुतळे जाळण्यात आल्याचे देवराहा यांनी सांगितले. यंदा अस्वच्छतेचा प्रश्न अधोरेखित करण्यासाठी ३० फुटाच्या झुरळाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांमुळे राजकीय संदर्भ

दिल्लीतील या निर्णयाची चर्चा सुरू असतानाच त्याला राजकीय संदर्भही जोडले जात आहेत. अलीकडच्या काळात कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि काही विद्यार्थी संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेत (SIR) अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून आंदोलन केले होते.

यापूर्वी जून आणि जुलै महिन्यात CJP ने NEET-UG परीक्षेतील पेपरफुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावरून तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले होते.

त्यामुळे झुरळाच्या पुतळ्याच्या दहनाला राजकीय अर्थही लावला जात आहे. मात्र, रामलीला समितीने या निर्णयामागे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT