पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीर खोर्यातील पहलगाम येथील बैसरन येथे (Pahalgam terrorist attack) मंगळवारी (दि.२२) लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यात ३० पर्यटकांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्यांनी श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षाबाहेर पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
श्रीनगरमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना अमित शहा भेटताच त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी शहा यांच्याकडे, 'आम्हाला न्याय हवा आहे', अशी मागणी केली.
त्यापूर्वी, मंगळवारी शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. मंगळवारी संध्याकाळी ते श्रीनगरला पोहोचले. 'हे भ्याड दहशतवादी कृत्य केलेल्यांना सोडले जाणार नाही.' असा इशारा त्यांनी दिला आहे. अमित शहा यांनी या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिली.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने दुःख झाले. या भ्याड दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटनेची माहिती दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल, असे अमित शहा यांनी म्हटले होते.