Jammu and Kashmir CM Omar Abdullah house arrested climbs wall
नवहट्टा ( श्रीनगर) : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शहीद दिनाच्या दिवशी प्रशासनाच्या बंदीचा निषेध करत नवहट्टा येथील 13 जुलै 1931 चे शहीद स्मशानभूमीत जबरदस्त आंदोलन केले. प्रशासनाने प्रवेशद्वार बंद केल्यामुळे त्यांनी स्वतः भिंत चढून स्मशानभूमीत प्रवेश केला.
13 जुलै हा दिवस जम्मू-काश्मीरमध्ये ‘शहीद दिन’ म्हणून ओळखला जातो. 1931 मध्ये डोगरा सैन्याकडून 22 निष्पाप नागरिकांची हत्या झाली होती. मात्र, 2020 पासून उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रशासनाने हा दिवस शासकीय सुटीच्या यादीतून वगळला आहे.
यावर्षीही प्रशासनाने कोणतेही कार्यक्रम होऊ नयेत म्हणून नॅशनल कॉन्फरन्सच्या अनेक नेत्यांना घरात नजरकैदेत ठेवले.
मुख्यमंत्रीच नजरकैदेत....
ओमर अब्दुल्ला सध्या नजरकैद (house detention) मध्ये आहेत. विशेषत: 13 जुलै 2025 रोजी “Martyrs’ Day” मध्ये भाग घेण्यापासून त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने त्यांना नजरकैद केले होते. त्यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सच्या अनेक मंत्र्यांना घराबाहेर जाणे प्रतिबंधित केले होते. शहीदांच्या समाधी स्थळावर जाण्यापासून त्यांना रोखणे हा यामागचा उद्देश होता.
ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह नवहट्टा चौकातून चालत स्मशानभूमीकडे जाताना दिसतात. दरम्यान, प्रवेशद्वार बंद आढळल्यामुळे त्यांनी भिंत चढून आत प्रवेश केला.
पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी झुंज देत अंत्यस्थळी ‘फातेहा’ अर्पण केली.
एका ट्विटमध्ये ओमर म्हणाले, "आज मला अडवण्यासाठी सरकारने सारे प्रयत्न केले. त्यांनी प्रवेशद्वार बंद केले, पोलिसांनी मला अडवले, पण मी थांबणार नव्हतो. मी काहीही बेकायदेशीर करत नव्हतो."
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांना पोलिसांकडून ढकलले जाताना दिसते. त्यांनी म्हटले, "ही कायदा रक्षण करणाऱ्यांची जबरदस्ती आहे. त्यांनाच विचारले पाहिजे की आम्हाला फातेहा अर्पण करण्यापासून रोखण्याचा कायदा कोणता आहे?"
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गेल्या एक-दोन दिवसांत याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरमधील लोकशाही ही निवडून न आलेल्यांची हुकूमशाही झाली आहे. दिल्लीने नियुक्त केलेल्या निवड न झालेल्या प्रतिनिधींनी जम्मू-काश्मीरच्या जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना बंदिस्त केलं आहे.
मला घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. हे पूर्णपणे लोकशाहीविरुद्धचं पाऊल आहे. निवडून आलेल्या सरकारला बंदिस्त केलं आहे. माध्यमांनी ही गोष्ट पूर्णपणे दडपून टाकली आहे. या विकले गेलेल्या लोकांची लाज वाटते. कायद्याचे रक्षक’ असलेल्या पोलिसांनी सांगावे की कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांनी आम्हाला फातिहा अर्पण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला?”
राजकीय आरोप-प्रत्यारोप
भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी तरुण चुग यांनी ओमर अब्दुल्लांवर टीका करत म्हटले की, "13 जुलै 1931 हे कुठले शहीद दिन नव्हे, तर तो एक सांप्रदायिक उठाव होता. जालियनवाला बाग हत्याकांडाशी याची तुलना करणे म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामाचा अपमान आहे."
तसेच त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सवर काश्मिरी पंडितांच्या निष्कासनाबाबत मौन बाळगल्याचा आरोपही केला.