नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.८) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटूंबाची भेट घेतली. केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरेंनी आई-वडील, पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत जवळपास अर्धातास चर्चा केली. केजरीवाल यांना बळजबरीने तुरुंगात डांबले गेले, सर्वजण मिळून या सरकारचा सामना करू, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्याचे समजते. (Uddhav Thackeray meets Sunita Kejriwal)
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
बुधवारी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा सपाटा
या बैठकीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, राघव चढ्ढा उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार संजय सिंह म्हणाले की, "अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायपालिकेने आदेशाची प्रत न ठेवता त्यांची सुटका थांबवली. त्यांना बळजबरीने तुरुंगात डांबले गेले सर्वजण मिळून या सरकारचा सामना करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी सुनीता केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे.”
दरम्यान, बुधवारी दुपारी संजय सिंह यांनी उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. ही भेट शिष्टाचार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच भाजप सरकारविरोधात आम्ही एकजूट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि इंडिया अलायन्सच्या इतर काही नेत्यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.