

कोल्हापूर : विशाळगड परिसरातील गजापुरात धार्मिक दहशतवाद करणार्या समाजकंटकांवर दहशतवादी कारवाई अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. तसेच त्या परिसरातील 144 कलम हटवून विशाळगडावरील दर्गा सुरू करावा. ज्यांची घरे पेटवून आर्थिक नुकसान केले, त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. विशाळगड, गजापुरात मुस्लिमांवर एवढा अन्याय, अत्याचार होऊनही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गप्प का, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, माजी खा. संभाजीराजे यांच्याबद्दल बोलण्यास आ. आझमी यांनी नकार देत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव त्यांनी खराब करू नये, असे सुनावले. राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीत मुस्लिमांची घरे पेटविणे, मशिदीची तोडफोड करणे हे अत्यंत चुकीचे घडले. कोल्हापूरबाहेरच्या समाजकंटकांनी हे केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. ‘चलो विशाळगड’ अशी हाक दिल्यानंतर पोलिसांनी सावध होण्याची गरज होती. मात्र जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी समाजकंटकांना धार्मिक तेढ निर्माण करण्यास सहकार्य केले. त्यामुळे त्यांना निलंबित करावे. मुस्लिमांची घरे पेटवा, असे आवाहन करणार्या सागर नावाच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोपही आझमी यांनी केला.
विशाळगडावर 1999 पूर्वीची घरे आहेत. अतिक्रमणे असतील तर जिल्हा प्रशासनाने सर्वच समाजाची अतिक्रमणे काढून टाकावीत. विशाळगडावरील दर्ग्यात 85 टक्के हिंदू व 15 टक्के मुस्लिम जातात. मोठ्या प्रमाणात भाविक ये-जा करत असल्याने शेकडो लोकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सरकार हिंदू-मुस्लिम यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. अधिकारी सरकारचे गुलाम बनले आहेत, असा आरोपही आ. आझमी यांनी केला. पत्रकार परिषदेला कॉम्रेड शिवाजीराव परुळेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.