Vijay TVK NEET
चेन्नई: दिल्लीत 'नीट' परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूतील सी. जोसेफ विजय यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार 'थलपती' विजय यांचा पक्ष, 'तमिळगा वेत्री कळघम' याने 'नीट' परीक्षेबाबत एक वेगळीच मागणी केली आहे.
वैद्यकीय शिक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवताना, 'टीव्हीके'ने मंगळवारी स्पष्ट केले की, 'नीट'मधील गैरप्रकार रोखणे पुरेसे नाही; त्याऐवजी ही संपूर्ण प्रवेश परीक्षाच कायमस्वरूपी रद्द केली जावी. वैद्यकीय शिक्षणासह शिक्षण क्षेत्रावरील संपूर्ण अधिकार राज्य सरकारांना द्यावे, अशी मागणी टीव्हीके'ने केली आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य आणि राज्यांचे अधिकार लक्षात घेऊन, टीव्हीकेने संविधानात महत्त्वपूर्ण बदल करण्याची मागणी केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, "या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी शिक्षण हा विषय 'समवर्ती सूची'तून काढून 'राज्य सूची'त समाविष्ट केला पाहिजे, असे पक्षाचे मत आहे. असे करताना काही कायदेशीर अडथळे निर्माण झाल्यास, तात्पुरती उपाययोजना म्हणून 'विशेष समवर्ती सूची' तयार केली जावी, असे पक्षाने नमूद केले. यामुळे वैद्यकीय शिक्षणावर राज्य सरकारांना पूर्ण अधिकार मिळतील. दीर्घकालीन आणि तात्पुरत्या अशा दोन्ही कालावधींसाठी आमचा हाच दृष्टिकोन आहे." हीच कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या उपाययोजनेची पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे सांगताना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी यापूर्वीही हा मुद्दा ठामपणे मांडल्याचा दावा टीव्हीकेने केला.
पक्षाने आपल्या निवेदनात मुख्य विरोधी पक्ष DMKचे नाव न घेता टीका केली. "आम्ही सत्तेत आल्यावर NEET रद्द करू," अशी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल करणारे राजकारण TVK कधीही करणार नाही, असे पक्षाने म्हटले. २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी DMKने सत्तेत आल्यानंतर NEET रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.
राज्य सूची शक्य नसेल तर विशेष समवर्ती सूचीची मागणी
पक्षाने पुढे म्हटले की, शिक्षणाचा विषय राज्य सूचीमध्ये हलविण्यास कायदेशीर किंवा घटनात्मक अडथळे असतील, तर तोपर्यंत अंतरिम उपाय म्हणून विशेष समवर्ती सूची (Special Concurrent List) तयार करावी. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासह संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर राज्य सरकारांना प्रभावी अधिकार मिळू शकतील.
इतरांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याच्या राजकारणावर टीका
TVKने आपल्या निवेदनात इतरांच्या संघर्ष, कल्पना आणि आंदोलनांवर स्वतःचा शिक्का मारण्याचे "अनैतिक राजकारण" करणाऱ्यांनी पक्षावर टीका करणे थांबवावे, असेही म्हटले आहे. ही प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सरकारवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. NEETविरोधी भूमिका घेणारे रॅपर 'थेरुक्कुरळ' अरिवू यांनी चेन्नईतील सचिवालयाबाहेर NEETविरोधी घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या घटनेवरून राज्यात राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे.