BJP gains from Trinamool split  
राष्ट्रीय

BJP gains from Trinamool split |तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी

पक्षातील बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचे संकट

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: उमेश कुमार

पश्चिम बंगालमध्ये आमदार फुटीच्या धक्क्यातून सावरत नाही तोच तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. लोकसभेच्या २८ खासदारांपैकी २० खासदारांनी वेगळी वाट धरत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही फूट कायदेशीर आणि घटनात्मक निकषांवर टिकली, तर याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर पडणार हे निश्चित आहे. या बंडखोरीमुळे बॅनर्जी यांच्यासमोर केवळ संघटनात्मक नव्हे, तर राजकीय अस्तित्वाचेच संकट उभे राहिले आहे.

लोकसभेत तृणमूल काँग्रेस हा आतापर्यंत विरोधी पक्षातील दुसरा सर्वात मोठा पक्ष होता. याच संख्याबळामुळे बॅनर्जी यांना 'इंडिया' आघाडीत विशेष राजकीय वजन मिळत असे. काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध कितीही चढ उतारांचे राहिले असले, तरी संसदेतील मजबूत उपस्थितीमुळे त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करणे सोपे नव्हते. आता पक्षाचा एक मोठा गट वेगळा झाला, तर सर्वात आधी या राजकीय ताकदीलाच धक्का बसेल.

भाजपसाठी हा घडामोडी केवळ २० खासदारांच्या पाठिंब्याचा विषय नाही. नरेंद्र मोदी सरकारकडे आधीच बहुमत आहे. परंतु, राजकारण म्हणजे केवळ सत्ता चालवणे नव्हे, तर राजकीय वातावरणनिर्मिती करणे देखील असते. विरोधी पक्षाचा सर्वात आक्रमक चेहराही स्वतःचे घर सांभाळू शकत नाही, असा प्रचार आता भाजप करेल. यामुळे भाजपला नॅरेटिव्हच्या लढाईत मोठा फायदा मिळू शकतो.

भाजपच्या युक्तिवादाला बळ

तृणमूल काँग्रेसमधील या फुटीमुळे मोदी सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या मोठ्या राजकीय मुद्द्यांवर आघाडी घेणे सोपे जाईल. केवळ अतिरिक्त खासदारांच्या जोरावर सरकार कोणतीही संवेदनशील घटनात्मक प्रक्रिया सहज पुढे नेऊ शकत नाही हे खरे असले, तरी विरोधी ऐक्यातील तडे त्यांच्यासाठी राजकीय मार्ग नक्कीच सोपा करू शकतात.

विरोधक संधिसाधूंची आघाडी असून त्यांच्याकडे कोणताही सामायिक वैचारिक पाया नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न भाजप प्रदीर्घ काळापासून करत आहे. तृणमूलमधील फुटीमुळे या युक्तिवादाला आणखी बळ मिळेल. ममता याचकाच्या भूमिकेत ममता बॅनर्जी यांच्या वैयक्तिक राजकीय प्रतिमेवरही याचा परिणाम होईल. काही वर्षापूर्वीपर्यंत त्यांची गणना विरोधकांकडून संभाव्य पंतप्रधानपदाच्या उमेदवारांमध्ये केली जात होती. आजही त्या भाजपविरोधी राजकारणाचा मोठा चेहरा आहेत. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे त्या आता 'याचकाच्या' भूमिकेत आल्या आहेत. आता त्यांना इंडिया आघाडीची, विशेषतः काँग्रेसची गरज आहे.

पश्चिम बंगालमधील लोकसभेची एक रिक्त जागा असलेल्या बशीरहाटमधून निवडणूक लढवून पुन्हा लोकसभेत पोहोचण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी त्यांना काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे. काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार उभा करू नये, अशी त्यांची इच्छा आहे.

इंडिया आघाडीसाठीही धक्का

इंडिया आघाडीला या घडामोडीचा मोठा धक्का बसला आहे. आघाडी आधीच नेतृत्व, रणनीती आणि सामायिक अजेंडा यावरून अनेक प्रश्नांचा सामना करत आहे. अशा वेळी त्यांचा एक प्रमुख घटक पक्ष फुटत असेल, तर विरोधी ऐक्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे नेतृत्व केवळ आपल्याच हातात सुरक्षित राहू शकते, हा विचार काँग्रेसमध्ये अधिक दृढ होऊ शकतो. यामुळे आघाडीतील सत्तेचा समतोल बदलू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT