PM Modi  file photo
राष्ट्रीय

PM Modi on Trinmool | तृणमूल गुन्हेगारांना पाठीशी घालतंय, बंगालमध्ये महिला असुरक्षित; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून पंतप्रधानांचा हल्लाबोल

PM Modi on Trinmool | 5400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पुढारी वृत्तसेवा

PM Narendra Modi in Bengal criticises Trinmool Congress

दुर्गापूर : पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार निशाणा साधला. कोलकात्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना तृणमूल काँग्रेस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करत, राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका त्यांनी केली.

दुर्गापूर येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते. एकीकडे विकासकामांचा शुभारंभ आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षावर थेट हल्ला, अशा दुहेरी भूमिकेत पंतप्रधान मोदी आज बंगालमध्ये दिसले.

त्यांनी राज्यात सुमारे 5400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

कायदा आणि सुव्यवस्थेवरून थेट प्रहार

पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत ममता बॅनर्जी सरकारला घेरले.

ते म्हणाले, "तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे की, येथे एका तरुण डॉक्टरवर अत्याचार झाले, तेव्हा तृणमूल सरकारने आरोपींना वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. देश त्या धक्क्यातून सावरलाही नव्हता, तोच दुसऱ्या एका महाविद्यालयात एका तरुणीबाबत भीषण गुन्हा घडला. त्या प्रकरणातही आरोपींचे संबंध तृणमूलशी असल्याचे समोर आले."

राज्यात न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये दंगली होतात आणि पोलिस एकतर्फी कारवाई करतात. येथे न्यायाचा कोणताही किरण दिसत नाही. राज्य सरकार आपल्याच लोकांच्या जीवाचे रक्षण करू शकत नाही."

पंतप्रधानांचे टीकास्त्र

  • कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपींना तृणमूल काँग्रेसचे संरक्षण.

  • राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली.

  • व्यावसायिकांकडून 'गुंडा टॅक्स' वसूल केला जातो, ज्यामुळे गुंतवणुकीला खीळ बसली आहे.

  • तृणमूल काँग्रेस सरकार विकास आणि रोजगार निर्मितीच्या विरोधात आहे.

'गुंडा टॅक्स'मुळे विकासाला अडथळा

पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेसवर आर्थिक खंडणीखोरीचाही आरोप केला. "पश्चिम बंगालमध्ये व्यावसायिकांकडून पैसे उकळले जातात, तृणमूलचे लोक त्यांना धमकावतात. तृणमूलच्या 'गुंडा टॅक्स'मुळे राज्यात गुंतवणुकीला अडथळा निर्माण होत आहे," असा दावा त्यांनी केला.

सत्ताधारी पक्ष राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले.

एकूण 5400 कोटी रुपयांचे प्रकल्प समर्पित

आपल्या दौऱ्यात पंतप्रधानांनी तेल आणि वायू, ऊर्जा, रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली.

  • बांकुरा आणि पुरुलिया जिल्ह्यांसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) 1950 कोटी रुपयांच्या शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी.

  • 'प्रधानमंत्री ऊर्जा गंगा' (PMUG) उपक्रमांतर्गत 1190 कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या दुर्गापूर-कोलकाता नैसर्गिक वायू पाइपलाइनचे (132 किमी) लोकार्पण.

या दौऱ्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मोतिहारी येथेही सभा घेतली होती. या वर्षी बिहारमधील त्यांच्या सहाव्या दौऱ्यात त्यांनी भोजपुरी भाषेतून उपस्थितांना संबोधित करत विकासकामांवर भर दिला आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) व काँग्रेसवर गरिबांना लुटल्याचा आरोप केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT